जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:02 PM2018-05-19T16:02:59+5:302018-05-19T16:02:59+5:30

तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती.

When tears are torn to the crematorium ... | जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

Next
ठळक मुद्देभिगवण येथील अपघातात एकाच कुटूंबातील पाच मृत जणांवर अंत्यसंस्कार चार पिढ्यांच्या या नात्यांची गुंफन असलेली शृंखला अपघाताच्या घटनेने तुटली

पिंपरी : देवदर्शनाहून परतत असताना गायकवाड कुटुंबावर शुक्रवारी सायंकाळी काळाने घाला घातला. एका क्षणार्धात कुटुंबातील पाच जण नियतीने यात हिरावून नेले. हा दिवस गायकवाड कुटुंब कधीही विसरु शकणार नाही.आई, वडील, मुले, सून आणि नातू अशा नात्यांची गुंफन असलेल्या एकाच कुटूंबातील पाच जणांवर निगडीतील स्मशानभूमीत शनिवारी सकाळी अत्यंत दु:ख आणि क्लेशदायक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातवाईकांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आकोशाने स्मशानभूमीही गहिवरली...नियतीच्या या खेळाने जीवनावरील तिची पकड पुन्हा एकदा अधोरेखित केली.. हेच सत्य... 
    तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. जेव्हा गायकवाड कुटुंबिय राहत असलेल्या यमुनानगर परिसरात ही दु: खद घटना समजली. त्यावेळेपासून तिथे हळहळ व्यक्त करण्यात येत होती. शनिवारी सकाळी एकाच वेळी निघालेल्या अंत्ययात्रेच्या वेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत नातेवाईकांनी अक्षरश: हंबरडा फोडला. या दु:खमय वातावरणामुळे अमरधाम स्मशानभुमी गहिवरली. सकाळी ८ वाजता अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याने ७ वाजता यमुनानगर येथून अंत्ययात्रा निघणार होती. तत्पूर्वी प्रकाश यांचे ९५ वषार्चे माता पिता यांना अंत्यदर्शनासाठी खाली आणले. वयोवृद्ध दांपत्याला वयोमानामुळे या घटनेबद्दल काही उमजत नव्हते. एकाच वेळी मुलगा,सून, नातू, नातसून आणि पणतू यांची अंत्ययात्रा त्यांच्या डोळ्यादेखत निघाली. हा प्रसंग पाहणाऱ्यांना गहिवरून आले. प्रकाश रामचंद्र गायकवाड (वय ६७), सुनीता प्रकाश गायकवाड (वय ५८) हे दांपत्य तसेच मुलगा संदीप प्रकाश गायकवाड (वय ४०) सून शीतल संदीप गायकवाड (वय ३२) आणि नातू अभिराज संदीप गायकवाड (वय ५) अशा या गायकवाड कुटूंबातील सदस्यांची एकत्रित निघालेली अंत्ययात्रा मन हेलावणारी होती. देवदर्शनासाठी गेलेल्या मोटारीत असलेल्या प्रमोद प्रकाश गायकवाड (वय ३०), हेमलता प्रमोद गायकवाड ( वय २८)  या दोघांनी शक्रवारी भररस्त्यातील हे मृत्यूचे तांडव पाहिले. त्यांनाही अपघाताची झळ बसली असून प्रमोद आणि हेमलता दोघेही जखमी झाले आहेत. हेमलताची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रमोद आणि हेमलता दिघीत राहतात. गायकवाड कुटुंबीय देवदर्शनासाठी मोटार घेऊन यमुनानगर येथून निघाले, त्यांनी दिघीतून प्रमोद आणि हेमलता यांना बरोबर घेतले होते. वडिल प्रकाश, आई सुनीता,भाऊ संदीप, वहिणी शीतल, आणि पुतण्या अभिराज यांचा अपघाती मृत्यू तसेच गंभीर जखमी झालेली पत्नी हे दृश्य प्रमोद यांच्यासाठी काळीज पिळवटून टाकणारे होते. 
 नात्याच्या उतरंडीची शृखंला तुटली
वयोवृद्ध असलेले ९५ वर्षांचे प्रकाश आणि संदीप यांचे आईवडील घरीच होते. तर विश्वराज हा त्यांचा सहा वर्षांचा पणतू सांगलीतील कवठेमहाकाळ जवळील वाघोली येथे उन्हाळी सुटीत मामाकडे गेला होता. पणजोबा, पणजी आणि पणतू हे या दुर्घटनेची झळ बसण्यापासून दूर राहिले. ९५ वर्षांच्या वयोवृद्ध दांपत्यास वयोमानामुळे कुटूंबियांवर काय संकट ओढवले हे समजू शकत नाही. तर मामाकडे गेलेल्या चिमुकल्या विश्वराज याला आई, वडिल आणि भाऊ अभिराज आणि आजी,आजोबा या जगातून नाहीसे झाल्याने पोरके होण्याची वेळ आली आहे. चार पिढ्यांच्या या नात्यांची गुंफन असलेली शृंखला अपघाताच्या घटनेने तुटली आहे. वयोवृद्ध पणजी, पणजोबा आणि अवघा सहा वर्षांचा चिमुकला विश्वराज राहिला आहे. वडिल गेले, चुलते प्रमोद जखमी आहेत. पण अगदी जवळच्या नात्याचे माता पित्याचे छत्र हरपल्याने चिमुकला पोरका झाला आहे. 

Web Title: When tears are torn to the crematorium ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.