भाजी मंडईला मुहूर्त कधी?

By admin | Published: May 10, 2017 04:00 AM2017-05-10T04:00:57+5:302017-05-10T04:00:57+5:30

वाकड थेरगाव परिसरात वाढलेले वसाहतीकरण आणि झालेली अव्वाच्या सव्वा लोकसंख्या, थेरगाव १६ नं परिसरात मुख्य रस्त्यावरील

When was the mahurut for the vegetable market? | भाजी मंडईला मुहूर्त कधी?

भाजी मंडईला मुहूर्त कधी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : वाकड थेरगाव परिसरात वाढलेले वसाहतीकरण आणि झालेली अव्वाच्या सव्वा लोकसंख्या, थेरगाव १६ नं परिसरात मुख्य रस्त्यावरील भाजी मंडईच्या गुऱ्हाळामुळे सतत होणारे अपघात या अनुषंगाने वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीसमोर नवनगर विकास प्राधिकरणाने २ कोटी ४३ लाख रुपये खर्चून उभारलेली प्रशस्त भाजी मंडई अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने विक्रेत्यांनी संपूर्ण रस्ता गिळंकृत केल्याने सातत्याने अपघात होत आहेत. त्यामुळे मंडई तत्काळ खुली करण्याची मागणी होत आहे.
काळेवाडी फाटा ते डांगे चौक रस्त्यावर सोळा नंबर येथील कावेरीनगर चौकात भाजीविक्रेते भर रस्त्यात दुकाने थाटतात. त्यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथे अतिक्रमण आणि भाजीविक्रेते यांच्यात लपाछपी सुरू असते. मी करतो मारल्यासारखे तू कर रडल्यासारखे असे अतिक्रमण विभागाचे धोरण असल्याचे जगजाहीर आहे. रस्त्याच्या मध्यभागापर्यंत हातगाड्या उभ्या करण्यामागे हप्तेगिरीचे मोठे रॅकेटदेखील सक्रिय असल्याने भाजी विक्रेत्यांची हिंमत वाढत आहे. या मंडईमुळे नागरिकांची जरी सोय होत असली, तरी अनेकांना अपघाती मरणदेखील आले आहे.
भाजीविक्रेत्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे दररोज छोटे-मोठे अपघात या ठिकाणी होत आहेत. हिंजवडी वाहतूक विभाग, महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाकड पोलीस यांनी अनेकदा संयुक्त कारवाई केली. मात्र काही दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ झाली. कारवाईनंतर भाजीविक्रेत्यांनी आम्हाला व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्या, अशी जोरदार मागणी करीत आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत नवनगर विकास प्राधिकरणाने कावेरीनगर येथे दोन वर्षांपूर्वी भाजी मंडई उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले होते. १८४ गाळ्यांच्या या मंडईचे काम जानेवारी २०१७ अखेर पूर्ण झाले आहे. केवळ उद्घाटनाअभावी वापराविना येथील गाळे धूळखात पडले आहेत.

Web Title: When was the mahurut for the vegetable market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.