नदीसुधार प्रकल्पास मुहूर्त कधी?; पवना नदी स्वच्छतेला प्रशासनाकडून दाद हवी : पर्यावरणप्रेमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:35 PM2017-12-14T13:35:41+5:302017-12-14T13:48:42+5:30
पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडीमधील तरुणांनी लोकसहभागातून पवना नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रशासन हा नदीसुधार प्रकल्प लवकर चालू करून साथ देणार का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांना पडला आहे.
रावेत : शहरातील पवना नदीचा सुधारित प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. पिंपरी, चिंचवड, वाल्हेकरवाडीमधील तरुणांनी लोकसहभागातून पवना नदी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. त्याला प्रशासन हा नदीसुधार प्रकल्प लवकर चालू करून साथ देणार का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांना पडला आहे.
पवना नदीविकास सुधारित प्रकल्प नदीतील गाळ काढून पात्र पूर्वस्थितीत आणणे, नदीपात्राच्या कडेने पर्यावरणपूरक भिंत बांधणे, नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी पात्राच्या कडेने पाईपलाईन टाकून आवश्यक त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन करणे, ते सांडपाणी नजीकच्या एसटीपीमध्ये शुद्धीकरणास पाठविणे, ज्या नाल्यामध्ये हे शक्य नाही, तेथे शुद्धीकरणासाठी छोटे मोड्युलर प्लॅन्ट बसवून सांडपाण्याचे शुद्धीकरण करणे, नदीकाठी वृक्षारोपण करणे, सायकल मार्ग करणे, तसेच नदीकाठावर विविध प्रकारची उद्याने, रेस्टॉरंट, मनोरंजनाची केंद्रे उभारणे आदी कामे केली जाणार आहेत. शहरातील पवना नदीचा सुधारित प्रकल्प निधीअभावी रखडला आहे. मुळा, पवना आणि इंद्रायणी या नद्यांच्या प्रदूषण पातळीत वाढ झाल्याने नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे.
पवना धरण ते दापोडी असा उगम ते संगम पवना नदीपात्र जलपर्णीमुक्त व स्वच्छ करण्याचा ध्यास आता सामाजिक संघटना व नागरिकांनीच घेतला आहे. त्यामुळे दर रविवारी न चुकता नागरिक स्वेच्छेने नदी घाटावर जमतात व आपली जबाबदारी समजून नदी स्वच्छतेत सहभागी होतात. हाच आहे वाल्हेकरवाडी पॅटर्न. ‘माझी नदी माझी जबाबदारी’ या उद्देशाने सुरू केलेल्या उपक्रमाला रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडी यांच्यासह सुमारे २२ सामाजिक संघटना, बचत गट, खासगी कंपन्या व नागरिक मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीत आहेत. पिंपरी-चिंचवड हा शहर व ग्रामीण असा मिश्र भाग आहे. त्यामुळे शेती व पिण्यासाठी नदीचे अस्वच्छ पाणी नागरिकांना वापरावे लागते. यातून ही कल्पना पुढे आली. हा उपक्रम करत असताना नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, बचत गट, खासगी कंपन्यांनीही अगदी आर्थिक मदतीपासून पुढाकार दर्शवला आहे. यामध्ये भावसार व्हीजन इंडिया, पीसीसीएफ, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान वाल्हेकरवाडी, बजरंग दल वाल्हेकरवाडी, पवना मिशन वाल्हेकरवाडी, निसर्ग हाऊसिंग सोसायटी यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर कल्याणी एण्टरप्रायजेस व ज्ञान प्रबोधिनी येथील डॅशिंग डॅड, साई रेडीमिक्स काँक्रिट यांनी अवजारे, एस. पी. वायर्स यांनी कामासाठी एक टीम व वाहतुकीची सोय, रानजाई संस्थेतर्फे मदत करण्यात आली. नोव्हेंबर-डिसेंबर हा जलपर्णी वाढण्याचा व नदी पात्रात पसरण्याचा काळ असतो. म्हणून ते काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.