हद्दवाढीचा निर्णय होणार कधी?
By admin | Published: August 8, 2015 12:37 AM2015-08-08T00:37:08+5:302015-08-08T00:37:08+5:30
फेब्रुवारी २०१७मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचनेबाबत नकाशे पाठविण्याचे काम आॅगस्टअखेर पूर्ण होणार आहे. एकसदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती
पिंपरी : फेब्रुवारी २०१७मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रारूप प्रभाग रचनेबाबत नकाशे पाठविण्याचे काम आॅगस्टअखेर पूर्ण होणार आहे. एकसदस्यीय की बहुसदस्यीय प्रभाग पद्धती या राज्य शासनाच्या निर्णयानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. शहराच्या लगतची गावे, समाविष्ट करून घेण्यासंदर्भात सप्टेंबर २०१६पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्णय घ्यावा, त्यानंतर कोणतीही हद्दवाढ करता येणार नाही, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याने हद्दवाढीचा निर्णय कधी होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिका निवडणूक सव्वा वर्षावर येऊन ठेपल्याने याविषयीची प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्तेही कामाला लागले आहेत. त्यांना निवडणूक कोणत्या प्रभागरचनेनुसार होणार, याची उत्सुकता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचनेचे काम जून महिन्यापासून सुरू झाले आहे. त्यानुसार महापालिकेतील निवडणूक विभाग कामाला लागला आहे. २०१२ची निवडणूक द्विसदस्यीय प्रभाग रचनेनुसार झाली होती. त्यात बदल करण्याचे संकेत भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिले आहे. त्यामुळे एक, दोन की तीन, चार सदस्यीय प्रभाग असेल, याबाबत राज्य सरकारचा निर्णय झाल्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.
गूगल मॅपचा आधार घेऊन २०११च्या जनगणनेनुसार महापालिकेची लोकसंख्या १७ लाख २९ हजार ६९२ एवढी आहे. या लोकसंख्येचे गट तयार करून ते गट एकत्रित करून नकाशा तयार केला आहे. सीमानिश्चितीसाठी मुख्य रस्ते, नदी, रेल्वेलाइन यांचा आधार घेतला आहे. त्यानुसार १५० घरे अथवा ८०० लोकसंख्येचा एक गट तयार केला आहे. असे एकूण ३१०२ गटांचा अधार घेऊन नकाशा तयार करण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. तयार केलेल्या नकाशानुसार चतु:सीमा तपासणीचे काम सुरू झाले आहे. नकाशा, परिसर आणि हद्द याविषयीची पाहणी कार्यकारी अभियंता आणि ज्युनियर इंजिनियर असे १३३ कर्मचारी करीत आहेत. तपासणी झाल्यानंतर ३१ आॅगस्टपर्यंत हे नकाशे महाआॅनलाइनवर अपलोड करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)