स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार कधी

By admin | Published: July 8, 2017 02:24 AM2017-07-08T02:24:38+5:302017-07-08T02:24:38+5:30

माण येथील गवारेवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवण्यात

When will the question of crematorium be resolved? | स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार कधी

स्मशानभूमीचा प्रश्न सुटणार कधी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंजवडी : माण येथील गवारेवाडी येथे स्मशानभूमी नसल्याने ग्रामस्थांना अंत्यविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. याबाबत वारंवार आवाज उठवण्यात येत असूनही हा विषय निकाली निघत नाही. यामुळे विकासाच्या दिशेने चाललेल्या माण गावातही समस्या कायम आहेत. परंतु टोलेजंग इमारतींच्या विळख्यात असलेल्या गवारेवाडीसाठी स्मशानभूमी नसणे ही निश्चितच समाधानकारक बाब नाही.
वरील भयानक परिस्थितीमुळे मोठ्या आयटी कंपनीशेजारी, तसेच अग्निशामक दलाच्या समोरच अंत्यविधी करावा लागत असल्याने नागरिक हैराण आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर होत असून, अनेकदा पावसातच अंत्यविधी करावे लागतात.
या परिसरात मोठी टाऊनशिप आहे. शेकडो कुटुंबे आता येथे वास्तव्यास आहेत. यातील अनेक जण राज्याबाहेरून आलेले आहेत. परिसरातील अधिक माहिती नसल्याने त्यांना हा प्रकार नवीन आहे. मात्र, भविष्यात त्यांनादेखील या समस्येला सामोरे जावे लागणार
आहे.
गगनचुंबी इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी तरी बिल्डरने अशा प्रकल्पास सहकार्याची भूमिका घेणे अपेक्षित होते. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सोयीचा एकही निर्णय विकासक घेत नाहीत. तसेच एमआयडीसीची भूमिकादेखील संशयास्पद असून, सदर स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करण्यात आली आहे. परंतु ही जागा अद्यापही हस्तांतरित करण्यात आली नाही. त्यामुळे सदर स्मशानभूमीचे काम मंजूर असूनही त्यास मुहूर्त मिळत  नाही.
विकासाच्या मृगजळातच सर्वसामान्य नागरिकांना डावलणे हितकारक नसून, प्रकल्पग्रस्तांच्या किमान सोयीसुविधा पुरवण्यासही प्रशासन कार्यक्षम नसावे, ही शरमेची बाब आहे. कारण माण येथील पुनर्वसनाला अनेक वर्षे उलटली आहेत. अद्यापही स्थानिकांना मोठ्या प्रमाणात समस्या भेडसावत आहेत. त्यावर लवकरात लवकर मार्ग निघणे आवश्यक आहे.

अमरधाम स्मशानभूमी : एकच विद्युतदाहिनी

तळवडे : निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची सुविधा महापालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे. परंतु येथील स्मशानभूमीत एकच विद्युत दाहिनी असल्याने एकापेक्षा जास्त अंत्यविधी करण्यासाठी मृतदेह आल्यावर मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
महापालिका प्रशासनाने गॅसदाहिनी प्रकरणाची सखोल चौकशी करून भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. नागरिकांना मात्र आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याची इच्छा असतानाही, पारंपरिक पद्धतीचा वापर करावा लागत आहे.
सध्याच्या काळात नागरिक पारंपरिक पद्धतीने म्हणजेच लाकडाचे सरण रचून त्यावर अंत्यविधी करण्याऐवजी आधुनिक पद्धतीने विद्युतदाहिनीत अंत्यविधी करण्यास प्राधान्य देत आहेत. पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करताना होणारे प्रदूषण, त्यासाठी लागणारी लाकडे, त्यासाठी होणारी वृक्षतोड आदी सर्व बाबींचा विचार करून शहरी भागातील नागरिकांचा अंत्यविधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी पर्यावरणपूरक असलेल्या विद्युतदाहिनीचा वापर करण्याकडे कल वाढत आहे.
निगडीतील अमरधाम स्मशानभूमी येथे केवळ एकच विद्युतदाहिनी आहे़ वेळप्रसंगी एकापेक्षा जास्त मृतदेह अंत्यविधी आल्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे़ एक मृतदेहाचे अंत्यविधी होईपर्यंत नातेवाइकांना ताटकळत थांबावे लागत आहे. जास्त वेळ थांबणे शक्य नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने पारंपरिक पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे.


गवारेवाडी स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित असून, एमआयडीसी, ग्रामपंचायत व पोलीस एकत्र आल्यास हा प्रश्न लवकर सुटेल. येथील स्मशानभूमी मंजूर असून, त्याचे काम सुरु करण्याच्या दृष्टीने लवकरच पावले उचलली जातील
- संदीप साठे, उपसरपंच, माण ग्रामपंचायत
निगडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत एक विद्युतदाहिनी कार्यरत आहे. दुसरी विद्युतदाहिनी सुरू करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु बसविण्यात आली नाही. आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. परंतु महापालिकेची गॅसदाहिनी खरेदीप्रकरणी प्रशासकीय कारवाई सुरू आहे. परंतु यामुळे निगडीतील अमरधाम स्मशानभूमी येथे नागरिकांना आधुनिक पद्धतीने अंत्यविधी करण्यासाठी एक विद्युतदाहिनी पुरशी नसल्यामुळे समस्या निर्माण होत आहे. नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याकडे प्राशासनाने लक्ष द्यावे.’’ -पंकज भालेकर, नगरसेवक

Web Title: When will the question of crematorium be resolved?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.