"मराठी सिनेमांची गळचेपी थांबणार कधी?" दिग्दर्शकानं टीडीएम चित्रपटाचं प्रदर्शन थांबविलं
By विश्वास मोरे | Published: May 2, 2023 10:58 PM2023-05-02T22:58:31+5:302023-05-02T23:00:40+5:30
चित्रपट निर्माण होणार कसे? मराठीची गळचेपी थांबणार कधी? अशी संतप्त भावना कऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी व्यक्त केली.
पिंपरी: थिअटर मिळत नसल्याने राष्ट्रपती पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांनी आजपासून टीडीएम चित्रपटांचे प्रदर्शन थांबविले आहे. थिअटरमध्ये प्राईम टाईम मिळत नसल्याने कऱ्हाडे यांनी भूमिका घेतली आहे. ‘मराठी सिनेमाला प्राईम टाईम मिळणार नसेल? तर मराठी चित्रपट सृष्टीत चांगले चित्रपट निर्माण होणार कसे? मराठीची गळचेपी थांबणार कधी? अशी संतप्त भावना कऱ्हाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी व्यक्त केली.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत ठराविक वितरकांची एकाधिकारशाही आहे. त्यामुळे मराठीतील चित्रपटांना थिअटर मिळण्यात अडचणी येतात. नवीन निर्माते आणि दिग्दर्शकांनी तयार केलेल्या चांगल्या कलाकृती चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. ख्वाडा, बबनच्या यशानंतर राष्ट्रपती पुरस्कार विजेते, प्रयोगशील दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा टीडीएम चित्रपट प्रदर्शित झाला आहे. अचानकपणे थिअटर चालकांकडून शो रद्द केले जात आहेत. त्यामुळे कराडे आक्रमक झाले आहेत. त्यांनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबविले आहे.
कऱ्हाडे म्हणाले, ‘‘एक चित्रपट कलाकृती निर्माण करण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कलाकृतीची निर्मिती केल्यानंतर तो रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. कलाकृती चांगली असून फायदा नाही. ती रसिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान आहे. माझा चित्रपट जिथे प्रदर्शित झालाय, तिथे चांगले ओपनिंग आलंय. मात्र, बहुतांश ठिकाणाहून महत्वाच्या वेळेचे शो रद्द होत आहेत. जिथे थिअटर हवे तिथे प्राईम टाइम देत नाहीत. मराठी चित्रपटाबाबतचा हा अन्याय चीड आणणारा आहे. माझ्यासारख्या अनेकांना त्रास होत आहे. राज्यात मुंबई वगळता साडेतीनशे सिनेमागृहे आहेत. त्यापैकी केवळ शंभर शो मिळाले. पुण्यात दिवसाला दीडशे शो होतात. त्यात आमच्या चित्रपटास हवे तेवढे शो नाहीत.’’
कोणाचा दबाव आहे कळत नाही!
आमच्या चित्रपटास प्राईम टाईम वेळ का नाही? याबाबत काही चित्रपटगृह चालकांशी संवाद साधला तर त्यांनी आमच्यावर दबाव आहे, असे सांगितले. कोणाचा दबाव आहे, हेही सांगितले जात नाही. असे जर होणार असेल तर मराठी चित्रपटांचे काय होणार? चांगल्या कलाकृती निर्माण होणार का? त्यामुळे आम्ही आजपासून प्रदर्शन थांबवित आहोत.
भाऊराव कऱ्हाडे (चित्रपट दिग्दर्शक)