वाहने धडकण्याचे प्रकार थांबणार कधी?
By admin | Published: May 7, 2015 05:03 AM2015-05-07T05:03:30+5:302015-05-07T05:03:30+5:30
नाशिक फाटा आणि भक्ती-शक्तीच्या जवळ मोठे बॅनर लावून मोठ्या वाहनांनी ग्रेडसेपरेटरमधून जाऊ नये, अशा सूचना लावण्याची गरज आहे.
पिंपरी : विनाअडथळा सुरक्षित आणि जलद वाहतुकीसाठी पुणे-मुंबई ग्रेडसेपरेटर मार्ग आहे. तिथून ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची वाहने जाऊ नये, म्हणून नाशिक फाटा येथे उंचीमापक कमान लावण्यात आले होते. मात्र, रविवारी कंटेनर धडकल्यामुळे ते मोडून पडले आहेत. त्यासाठी उभे केलेले खांब वाकले आहेत, तर त्याचा बेसमेंटही उखडला गेला आहे. नाशिक फाटा आणि भक्ती-शक्तीच्या जवळ मोठे बॅनर लावून मोठ्या वाहनांनी ग्रेडसेपरेटरमधून जाऊ नये, अशा सूचना लावण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन एका ठिकाणी उंचीमापक कमान उभी करून काम झाले, असे समजत असल्याने हे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
कंटेनरची धडक इतकी मोठी होती की, उंचीमापक कमान लोखंडी असतानासुद्धा ते पूर्णपणे वाकले आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये अनेक वेळा वाहने अडकली आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याच्या घटना नियमित घडत असतात. त्यातच चौकाच्या स्लॅबला अनेक वाहने धडकू न त्यामध्ये स्लॅबचे नुकसान झाले आहे.
या घटना कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने खराळवाडी येथे उंचीमापक कमान लावले होते. ते कंटेनरच्या धडकेत तुटले होते. त्यामुळे वाहने प्रवेश करतात, तेथेच उंचीमापक कमान लावण्यात आले. मात्र, हेदेखील १५ दिवसांतच तुटलले आहे. हे लावण्यासाठी पालिकेला सात वर्षे लागली. कंटेनरच्या धडकेत उंचीमापक कमान मोडून पडले. मात्र, त्याचबरोबर त्याचा बेसमेंटसुद्धा उखडला आहे. त्यामुळे कामाचा दर्जाही चांगला असला पाहिजे.
गे्रडसेपरेटचे काम होऊन आठ वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत अनेक वेळा कंटेनर अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. या कंटेनरमुळे ग्रेडसेपरेटरच्या स्लॅबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात नियमित कंटेनर अडकल्यामुळे स्लॅबचा बाग तुटून पडला होता. हजारो कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्याचे ना पालिकेला ना पोलिसांना काही घेणेदेणे आहे. सात वर्षांनंतर लावलेले उंचीमापक कमान तकलादू असल्याने ते लगेच तुटून पडत आहेत.
मोठ्या वाहनांना शहरातून बंदी घातली पाहिजे किंवा त्यांच्यावर पोलिसांनी नियंत्रण तरी ठेवले पाहिजे. या वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे कशाही पद्धतीने गाड्या चालवल्या जात आहेत. (प्रतिनिधी)