आॅनलाइन पोस्ट आॅफिस शोधायचे कुठे?, ग्राहकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 02:17 AM2017-09-09T02:17:29+5:302017-09-09T02:18:17+5:30
टपाल कार्यालयात अजूनही इंटरनेट कनेक्शन पोहचले नसल्याने कित्येक पोस्ट आॅफलाइन आहेत. यामुळे नागरिकांना इंटरनेट कनेक्शन असलेले पोस्ट आॅफिस शोधत वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
तळवडे : टपाल कार्यालयात अजूनही इंटरनेट कनेक्शन पोहचले नसल्याने कित्येक पोस्ट आॅफलाइन आहेत. यामुळे नागरिकांना इंटरनेट कनेक्शन असलेले पोस्ट आॅफिस शोधत वणवण फिरण्याची वेळ आली आहे.
पोस्टात केवळ पत्र पाठविणे, मनी आॅर्डर करणे, तार करणे आदी पारंपरिक कामांशिवाय स्पीड पोस्ट करणे, रजिस्टर करणे, पी.एल.आय. (विमा) चे हप्ते भरणे पोस्ट बँकेची आदी स्वरूपाची कामेही केली जातात़ परंतु स्पीड पोस्ट करणे, रजिस्टर करणे, किंवा पी.एल.आय.चे हप्ते भरणे तसेच आधार लिंक करणे आदी कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा असणे गरजेचे आहे. परंतु कित्येक पोस्टात इंटरनेट कनेक्शन नाही तर कित्येक पोस्टात पुरेसे स्पीड नसल्याचे कारण सांगून ती कामे करता येणे शक्य नसल्याचे कर्मचाºयांकडून सांगितले जाते. त्यामुळे नागरिकांना एका पोस्टातून दुसºया पोस्टात भटकत फिरावे लागत आहे. ज्या पोस्टात इंटरनेट कनेक्शन आहे, तिथे नागरिकांच्या रांगा असतात.
साईट बंद असल्याचे सांगितले जाते कारण
पी.एल.आय. चा हप्ता भरणे म्हणजे दिव्य केल्यासारखे होत असल्याची तक्रार पोस्टाचे विमाधारक सांगत आहे. वर्षभरापूर्वी आमचा विमा आॅनलाइन भरण्यासाठी नोंदणी रुपीनगर येथील पोस्ट कर्मचाºयांनी केली. परंतु त्यानंतर स्थानिक पोस्टाने आमच्याकडे आॅनलाइन हप्ता भरण्याची सोय नसल्याचे सांगितले. त्यानंतर चिखली, आकुर्डी या पोस्टातही वेळोवेळी चौकशी केली; परंतु पोस्टात अद्यापही इंटरनेट कनेक्शन पोहचले नसल्यामुळे हप्ता भरणे शक्य झाले नाही़ शेवटी चिंचवडच्या पोस्ट आॅफिसमध्येही चौकशी केली; परंतु तेथेही साईड बंद असल्याचे सांगून हप्ता स्वीकारण्यास असमर्थता दाखविली़
पॉलिसी बंद पडण्याची भीती
आता वर्षभर हप्ता भरला नसल्यामुळे पॉलिसी बंद पडली आहे. ती सुरू करण्यासाठी पुण्यातील आॅफिसमध्ये जावे लागेल असे सांगितले. पोस्टाचा विमा घेताना हप्ता कोणत्याही पोस्टात भरता येईल, असे पोस्ट मास्तरांनी सांगितले होते. आता मात्र हप्ता स्वीकारणारे पोस्ट कोठे आहे हे शोधावे लागत असल्याने मनस्ताप होत आहे. पोस्टात असलेले इंटरनेटचे कनेक्शन २ एमबीपीएस एवढ्या स्पीडचे आहे. परंतु पोस्टाची साईट सुरळीत चालण्यासाठी किमान ८ एमबीपीएस़चे स्पीड असणे गरजेचे आहे. एवढ्या कमी स्पीडमुळे कामे करणे अवघड होत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.
ज्येष्ठांना सहन करावा लागतोय त्रास
शहर परिसरामध्ये अनेक पोस्ट कार्यालयात नागरिक हेलपाटे मारत आहेत. रांगा कमी होत नसल्याने तसेच नेटची कनेक्टिव्हीटी मिळत नसल्याने ग्राहकांच्या पदरी निराशाच पडत आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. अनेक ज्येष्ठांनी गुंतवणूक पोस्ट कार्यालयातच केली आहे. त्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने औषधोपचारासाठी अडचण येत आहे. पोस्ट कार्यालयाने योग्य ती सुविधा करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. परंतु, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.