ओझर्डेतील ट्रॉमा सेंटरला मुहूर्त कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:50 AM2018-02-23T00:50:53+5:302018-02-23T00:50:57+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेली ट्रॉमा सेंटरची इमारत वापराअभावी पडून आहे
शिरगाव : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातग्रस्तांना तातडीने उपचार सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने बांधण्यात आलेली ट्रॉमा सेंटरची इमारत वापराअभावी पडून आहे. अपघातग्रस्तांना निगडी किंवा खालापूर येथील रुग्णालयाशिवाय पर्याय नाही. हे ट्रॉमा सेंटर सुरू होण्यास कधी मुहूर्त लागणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम २००० साली पूर्ण झाल्यावर रस्त्यावरील प्रतितास ८० किलोमीटरची वेगमर्यादा न पाळता वाहनचालकांनी सुसाट वाहने पळविण्यास सुरुवात केली. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी व रुग्णावर वेळीच उपचार व्हावेत यासाठी पाच वर्षांपूर्वी मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओझर्डे गावाजवळ वूड स्टॉक लिमिटेड या कंपनीच्या वतीने ७० लाख रुपये खर्चून नऊ एकर जागेत सर्व सोर्इंनी परिपूर्ण असे अद्ययावत असे ट्रॉमा सेंटर व शेजारीच हेलीपॅड उभारण्यात आले. या ट्रॉमा सेंटर व हेलीपॅडचे काम पूर्ण झाल्यावर हस्तांतरणासाठी बराच काळ गेला. दरम्यानच्या काळात ट्रॉमा सेंटरचे काम पूर्ण करणाºया कंपनीच्या वतीने या इमारतीचे हस्तांतरण रस्ते विकास महामंडळाकडे करण्यात आले. हे अत्याधुनिक ट्रॉमा सेंटर सरकारच्या आरोग्य विभागाने, की रस्ते विकास महामंडळाने चालवायचे या घोळात तीन वर्षे लटकले. तरीही अद्याप ट्रॉमा सेंटर सुरु झालेले नाही.
सध्या लोणावळ्यापर्यंतच्या अपघातातील जखमींना उपचारासाठी निगडी येथील येथे, तर खंडाळा- खालापूर ते पनवेलपर्यंतच्या जखमींना कळंबोली येथील रुग्णालयात न्यावे लागते. यात उपचारासाठी बराच वेळ जात असल्याने रुग्ण दगावण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवाई रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात आले. परंतु अद्याप एकही हेलिकॉप्टर या ठिकाणी उतरलेले नाही. तसेच सध्या बांधून तयार असलेल्या हेलीपॅडवर गवताचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी त्याला तातडीच्या उपचाराची गरज असून, हे उपचार मिळण्यासाठी ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.