पाणी बिलाचे पाणी मुरतेय कोठे?
By Admin | Published: April 23, 2017 04:19 AM2017-04-23T04:19:00+5:302017-04-23T04:19:00+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मुंबईतील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी बिलावर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मुंबईतील कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे पाणी बिलावर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात आला. एकीकडे अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई करून दंड वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे हा दंड ठेकेदाराकडून वसूल करण्यात आला. मात्र, पाणीबिलाच्या भुर्दंडाला नेमके होण जबाबदार आहे, हे गुलदस्त्यातच आहे.
कामगार मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या पाणी बिलावर २००९ ते १३ या कालावधीत तब्बल १३ लाख २८ हजार इतकी दंडाची रक्कम होती. तत्कालीन अधिकारी यांच्या अभिप्रायांनुसार बीले न मिळणे व महापालिका देयके यंत्रणा अद्ययावत करण्याच्या कारणामुळे दंड भरावा लागल्याचे कारण देण्यात आले. तसेच ज्यांच्या चुकीमुळे दंड आकारण्यात आला त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात आल्याचे मंडळाच्या प्रशासनाने
स्पष्ट केले. मात्र, माहिती
अधिकारात ही दंडाची रक्कम मंडळाच्या दोन ठेकेदारांकडून
वसूल करण्यात आल्याचे समोर
आले आहे.
पुन्हा दंडाच्या रकमेची ठेकेदारांकडून वसुली कशी काय?, पाण्याच्या बिलापोटी १३ लाख २८ हजार इतका दंड असताना ठेकेदारांनी १२ लाख ८४ हजार इतकाच भरला आहे. तर उर्वरित दंड कोणी
आणि का भरला ? याविषयीची माहिती अस्पष्ट असल्याचे कार्यकर्ते बाबूराव पाटील यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
अधिकाऱ्याच्या वाहनांमधून खर्चाचा ‘धूर’
कामगार मंडळाचे अधिकारी वापरत असलेल्या वाहनांच्या दुरुस्ती व इंधनासाठी वारेमाप खर्च केला जात आहे.
मंडळाच्या वाहन वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रती महिना डिझेल, पेट्रोल व दुरुस्तीसाठी मासिक कमाल मर्यादा साडेसात हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
मात्र, प्रत्यक्षात २०१२ ते २०१४ या वर्षातील काही महिन्यात अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी ५० हजार, ६५ हजार आणि ८५ हजार रुपयांचे खर्च दाखविण्यात आले आहेत.