तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू; १३ वर्षीय मुलानं वाचवले दोघांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:51 PM2021-09-27T20:51:35+5:302021-09-27T20:57:39+5:30
दोन सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले
पिंपरी : पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी एकाचा तलावात बुडून मृत्यू झाला. एका १३ वर्षीय मुलाने तीन मुलांचे प्राण वाचविले. यातील दोन सख्ख्या भावांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यातील एकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सद्गुरूनगर, भोसरी येथे सोमवारी (दि. २७) दुपारी ही घटना घडली.
सूरज अजय वर्मा (वय १२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३), अशी मृत्यू झालेल्या दोन मुलांची नावे आहेत. संदीप भावना डवरी (वय १२),, ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय १४) या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले. यातील ओमकार आणि ऋतुराज हे दोन्ही सख्खे भाऊ होते. आयुष गणेश तापकीर या १३ वर्षीय मुलाने बुडत असलेल्या दोघांना वाचविले.
भोसरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्गुरूनगर, भोसरी येथे जुन्या कचरा डेपोजवळ तलाव आहे. त्या तलावाजवळ १२ ते १५ वयोगटातील चार मुले खेळत असताना ते पोहण्यासाठी तलावात गेले. त्यावेळी पोहताना मुले बुडू लागली.
दरम्यान, आयुष तापकीर हा मुलगा म्हैस चारायला तलावाजवळ गेला होता. त्यावेळी मुले तलावात बुडत असल्याचे आयुष याच्या निदर्शनास आले. मुलांना वाचविण्यासाठी आयुष याने तलावाच्या दिशेने धाव घेतली. संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना आयुष तापकीर याने पाण्याबाहेर काढले. मात्र सूरज तलावात बुडाला. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील ओमकार आणि ऋतुराज या दोन्ही सख्ख्या भावांना वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ओमकार याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सूरज याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
आयुष तापकीर याने तीन मुलांना पाण्याबाहेर काढले. त्यातील ओमकार याची प्रकृती गंभीर होती. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तर संदीप डवरी व ऋतुराज शेवाळे यांना वाचविण्यात आयुष याला यश आले.