पवना नदीत विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
By नारायण बडगुजर | Updated: September 29, 2023 18:47 IST2023-09-29T18:46:41+5:302023-09-29T18:47:35+5:30
सोबत असलेल्या दोघांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो वाहून गेला

पवना नदीत विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
पिंपरी : गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेला तरुण पवना नदीत बुडाला. मावळ तालुक्यातील गहुंजे येथे पवना नदी घाटालगतच्या स्मशानभूमीजवळ गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. प्रभूदयाल हरिराम विश्वकर्मा (२१, रा. साईनगर, गहुंजे, ता. मावळ, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभूदयाल विश्वकर्मा हा गुरुवारी सायंकाळी गहुंजे येथील पवना नदीच्या घाटावर घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी आला. त्यावेळी घाटालगतच्या स्मशानभूमीजवळ विसर्जनासाठी तो पवना नदीत गेला. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी त्याला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पाण्यात वाहून गेला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तळेगाव दाभाडे येथील वन्यजीव रक्षक या पथकाकडून त्याचा शोध घेण्यात आला. मात्र, प्रभूदयाल मिळून आला नाही. शुक्रवारी सकाळपासून शोधकार्य राबविले. तरीही त्याचा शोध लागला नाही. शिरगाव परंदवडी पोलिस तपास करीत आहेत.