लाच घेताना सहायक पोलीस निरीक्षकास भोसरीत रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:20 PM2017-10-27T17:20:44+5:302017-10-27T17:33:52+5:30
पन्नास हजारांची लाच घेणार्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पिंपरी : दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणार्या भोसरी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ बाजीराव नाळे (वय ४२, रा. केंद्रीय विहार सोसायटी, पांजरपोळ चौक, मोशी), पोलीस हवालदार वैभव नारायण चौधरी (वय ३१, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी ताब्यात घेतलेल्या पोलिसांची नावे आहेत.
या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात ३६३ कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी नाळे आणि चौधरी यांनी तक्रारदाराकडे पन्नास हजारांची लाच मागितली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गवळी, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली.
दोन दिवसांपूर्वीच कोंढवा पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती मोरे व शिपाई हर्षल शिवरकर यांना पंधरा हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. हे प्रकरण ताजे असतानाच शुक्रवारी पुन्हा सहायक निरीक्षकासह हवालदाराने लाच घेतल्याने खळबळ उडाली आहे.