हातगाड्यांना अभय कोणाचे?
By admin | Published: July 8, 2015 02:17 AM2015-07-08T02:17:49+5:302015-07-08T02:17:49+5:30
शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी : हा येथील मुख्य चौक असून, येथून रावेत मार्ग अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे जाण्या-येण्याकरिता वापर करतात
रावेत : शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी : हा येथील मुख्य चौक असून, येथून रावेत मार्ग अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे जाण्या-येण्याकरिता वापर करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी असते. रस्त्यावर भाजीविक्रेते हातगाड्या बिनधास्तपणे उभ्या करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो. येथेच पालिकेची शाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांची सतत गर्दी असते.
विक्रेत्यांची दादागिरी
गुरुद्वारा चौक : हा चौक नेहमी गजबजलेला असतो. चौकातून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे आणि वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक व्यावसायिक हातगाड्या उभ्या करून रस्ता अडवतात. भाजीविक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंस अतिक्रमण केल्यामुळे रस्ता कोठे आहे, याचा शोध वाहनचालक व नागरिकांना घ्यावा लागतो. गुरुद्वारा चौक ते वाल्हेकरवाडी हा मार्ग रस्ता दुभाजकामुळे अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाड्या उभ्या असल्यामुळे रस्ता शोधणेसुद्धा नागरिकांना शक्य होत नाही. काही वेळा नागरिक या विक्रेत्यांना विनंती करण्यास गेल्यावर न ऐकता विक्रेते नागरिकासोबत हुज्जत घालतात.
स्पाइन रोड बिजलीनगर : वाहतुकीचा परिसरातील सर्वांत मोठा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर रेलविहार वसाहतीलगत असणाऱ्या मुख्य चौकात नेहमी नागरिक आणि वाहनांची गर्दी असते. येथून अनेक विद्यार्थी परिसरातील अनेक विद्यालयांत ये-जा करीत असतात. चौकालगतच अनेक व्यावसायिकांनी हातगाड्या उभ्या केल्या आहेत. वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतो. अशीच परिस्थिती आकुर्डी रेल्वे स्टेशन आणि डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलालगत पाहावयास मिळते. पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यास अतिक्रमण विभाग काही तासापुरती कारवाई करते. पुन्हा काही वेळाने परिसरात जैसे थे परिस्थिती पाहावयास मिळते. तरी, पालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करून रस्ते मोकळे करावेत, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
आम्ही पालिका प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा
प्रशासन यांच्यावर कारवाई करीत
नाही व पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे परिसरातील सर्वच मुख्य चौक व मार्गावर हातगाड्यांची संख्या दिवसेन्दिवस वाढत चालली आहे. बिनधास्तपणे विक्रेते हातगाडे
रस्त्यावर लावतात. अशा सर्व हातगाड्यांवर कायमस्वरूपी कारवाई करावी, अशी मागणी वाहतूक सल्लागार समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)