रस्त्याच्या दुतर्फा वाहन पार्किंगला अभय कोणाचे?
By Admin | Published: March 11, 2017 03:21 AM2017-03-11T03:21:23+5:302017-03-11T03:21:23+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले, तर काही चौकांचा व्यास वाढविण्यात आला. इतकेच नाही, तर अनेक ठिकाणी
रहाटणी : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, म्हणून काही रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले, तर काही चौकांचा व्यास वाढविण्यात आला. इतकेच नाही, तर अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. तरीही वाहतुकीची समस्या सुटण्याचे नाव घेत नाही.
रस्त्याच्या दुतर्फा बिनदिक्कतपणे रिक्षा, बस, ट्रक उभे केले जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेकदा काळेवाडी फाटा- एमएम शाळा या दरम्यान सकाळ-सायंकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. वाहतूक पोलीस बेशिस्त चालकांवर कोणत्याच प्रकारची कारवाई करीत नसल्याने सामान्यजन आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या अनधिकृत पार्किं गला अभय कोणाचे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. अशा वाहनांवर कारवाई करून रस्ते मोकळे करण्याची माफक अपेक्षा स्थानिक व इतर चालक व्यक्त करीत आहेत.
काळेवाडी फाटा ते एमएम शाळा या दरम्यान दुतर्फा रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात रिक्षा, खासगी बस, ट्रक उभ्या केलेल्या असतात. रहाटणी फाटा ते काळेवाडी फाटा या दरम्यान मोठ्या प्रमाणात माल वाहतूक टेम्पो, ट्रक अगदी रस्त्यावरच वाहनांना अडथळा निर्माण होईल, अशा अवस्थेत उभे केलेले असतात. अनेक वेळा वाहतूक पोलीस फक्त भूमिका घेतात. अगदी ज्या ठिकाणापासून पूल सुरू होतो. त्यापासून तर एमएम शाळेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे इतर वाहनांना मोठी कसरत करावी लागत आहे.
काही वाहने तर कायमस्वरूपी उभी असल्याचे दिसून येत आहे. तरी त्याकडे वाहतूक पोलीस लक्ष देत नाहीत. हे सर्व काही वाहतूक पोलिसांच्या मर्जीने सुरूआहे, अशा पद्धतीने सुरू आहे. सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असल्याने चाकरमान्याला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा व तापकीर चौक या ठिकाणी वाहतूक पोलीस असतात. मात्र वाहतूक सुरळीत करण्याऐवजी चिरीमिरी जमा करण्याकडेच त्यांचा कल दिसून येतो. पाहावे तेव्हा एका कोपऱ्यात उभे राहून वाहन अडविणे, दंडाच्या पावत्या फाडणे यातच ही मंडळी दंग असतात. हा बीआरटी रस्त्याएवढा मोठा होऊनही एक लेनच सुरू असते. तेही वाहनचालकाला आपला जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.
या रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनावर संबंधित विभागाकडून कारवाई केली का जात नाही, याचे कोडे नागरिकांना सुटत नाही.
रहाटणी फाटा येथे खासगी बस एजंटची अनेक कार्यालये आहेत. या ठिकाणाहून राज्यात नव्हे, तर राज्याबाहेरही बसगाड्या जातात. या बसगाड्या या ठिकाणी रात्री आठच्या सुमारास येतात. अवघ्या दोन तासांत अनेक बस रांगेत उभ्या राहिल्याने, तर वाहनांना याचा त्रास सहन करावा लागतो. शिवाय तासन्तास वाहतूककोंडी होते. तरी वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प का, या बसवर कारवाई केली का जात नाही, असा सवाल वाहनचालक उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)
बाबू नेमके कोण? : वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा व तापकीर चौक या ठिकाणी सकाळ व संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात असतात. अनेक वेळा पोलीस रहदारी करणाऱ्या वाहनांना थांबवून या ना त्या कारणावरून दंडाच्या पावत्या करीत असतात, तर काही वेळा वाहतूक सुरळीत करण्याचे कामही करतात. मात्र, दिवसेंदिवस नो पार्किंगमध्ये उभे असणाऱ्या वाहनावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना सतावत आहे. यात पोलिसांचे आर्थिक संबंध गुंतले आहेत की काय, अशीही चर्चा नागरिक करीत आहेत.
या रस्त्याने दिवसातून अनेक वेळा संबंधित विभागाचे कर्मचारी, अधिकारी ये-जा करीत असतात; मग या वाहनांवर कारवाई का केली जात नाही, त्यांना अभय का आणि कोणाचे हा प्रश्न आहे. सध्या रस्त्यावरील पार्किं गचे दरमहा भाडे काही सरकारी बाबूंना दिले जात असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे. हे बाबू नेमके कोण याची उत्सुकता अनेक नागरिकांना लागली आहे.