कोण प्रदूषित करतंय? इंद्रायणी पुन्हा फेसाळली; प्रशासनाला जाग कधी येणार
By विश्वास मोरे | Published: January 3, 2024 12:29 PM2024-01-03T12:29:57+5:302024-01-03T12:30:42+5:30
इंद्रायणी कोण प्रदूषित करतेय हे अजूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सापडलेले नाही
पिंपरी : इंद्रायणीनदी सुधारच्या नुसत्या गप्पा मारल्या जात आहेत. गेल्या सहा महिन्यांमध्ये इंद्रायणीनदी चार वेळा फेसाळली आहे. वारंवार नदी फेसाळत आहे. मात्र, एमआयडीसी, पीएमआरडीए, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला त्याचे गांभीर्य नाही. इंद्रायणी कोण प्रदूषित करतेय हे अजूनही प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सापडलेले नाही.
इंद्रायणी नदीच्या उगम ते संगम या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकरण वाढले आहे. लोणावळ्यापासून तर तुळापूर पर्यंत नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे. इंद्रायणीच्या काठावर तळेगाव एमआयडीसी, देहू निघोजे एमआयडीसी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भाग वसलेला आहे. चाकण आणि आळंदीच्या साईटने निघोजेपासून तर आळंदीपर्यंत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर कंपन्या निर्माण झाले आहे.
एमआयडीसी पीएमआरडीए आणि नगरपालिका महानगरपालिका यांचा भाग नदीकाठी आहे. या भागातील मैला सांडपाणी तसेच कंपन्यांचे रसायन युक्त पाणी थेटपणे नदीमध्ये सोडले जात आहे. याचा परिणाम आषाढीवारीपासून कार्तिकीवारी पर्यंत चारवेळा नदी फेसाळली आहे. काल सायंकाळपासून नदी फेसाळल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. बुधवारी सकाळपर्यंत सलग दुसऱ्या दिवशी इंद्रायणी नदीचे हे भयाण रूप पहायला मिळाले. याबाबत पर्यावरणवादी संस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राजकारणी नुसतेच पत्रके काढण्यात व्यस्त!
पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आमदार खासदार हे नुसतेच प्रसिद्ध पत्रकार काढण्यात व्यस्त असल्याचे दिसून येते. नदी प्रदूषणाबाबत अधिवेशनात आवाज उठवला गेला. त्याची प्रसिद्धी माध्यमातून मोठ्या प्रमाणावर झाली. मात्र, उपाययोजनांना अजूनही सुरुवात झालेली नाही.