सेवा रस्ता कोणाच्या मालकीचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 12:57 AM2018-08-30T00:57:19+5:302018-08-30T00:59:21+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर वाकड-थेरगाव भागात अवैध पार्किंग
वाकड : मुंबई-बंगळूर द्रुतगती महामार्गाच्या देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर वाकड आणि थेरगाव भागात मोठ्या प्रमाणात अवैध पार्किंग करण्यात येत आहे. सेवा रस्त्यावर वाहने थांबवून वाहतुकीचा खोळंबा केला जात आहे. त्यामुळे हा सेवा रस्ता नेमका कोणाच्या मालकीचा आहे, असा संतप्त सवाल वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. असे असतानाही याकडे वाहतूक पोलीस आणि संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. या अवैध पार्किंगवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बाह्यवळण मार्गावर वाकड परिसरात वाहन विक्रीची पाच ते सहा दालने (शोरूम) आहेत. या शोरूमवाल्यांकडून त्यांची विक्रीची आणि अन्य वाहने सेवा रस्त्यात पार्किंग केली जातात. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूककोंडी होते. भूमकर चौक, वाकड परिसरात बाह्यवळण मार्गाला लागून या सर्व शोरूमची मनमानी पाहायला मिळते. सर्वांनी सार्वजनिक सेवा रस्ता म्हणजे त्यांचे पार्किंगच केले आहे. संपूर्ण सेवा रस्त्यावर शोरूमला येणारे ग्राहक, कामगार आणि दुरुस्तीसाठी आलेल्या शेकडो चारचाकी मोटारी, तसेच कामगारांच्या दुचाकी बिनबोभाट पार्क केल्या जात असल्याने इतर वाहनचालकांनी आणि पादचाऱ्यांनी जायचे कुठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. संपूर्ण सेवा रस्ता या शोरूमवाल्यांनी व्यापल्यामुळे नाईलाजाने वाहनचालकांना आणि पादचाºयांना जीव धोक्यात घालून थेट महामार्गावरून ये-जा करावी, तसेच येथील एका शोरूमसमोरील चौकात महामार्गावरून सेवा रस्त्यावर जाता येते. मात्र येथे शोरूममुळे ऐन रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्याने येथे वारंवार अपघात होतात.
आयटी पार्कमुळे मुंबई-बंगळूर बाह्यवळण मार्गालगत अनेक नामांकित वाहन कंपन्यांच्या शोरूमने पाय रोवले आहेत. या सर्व शोरूमने बाह्यवळण मार्गाचा सेवा रस्ता पार्किंगसाठी काबीज केला आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि मधोमध शोरूमवाल्यांच्या चारचाकी आणि दुचाकी पार्किंग केल्या जातात. याकडे वाहतूक पोलीस सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. बाह्यवळण मार्गावरच वाकड वाहतूक पोलीस विभाग असूनही या अवैध पार्किंगकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पोलिसांसमोरच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. बेशिस्त वाहनचालकांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाºया शोरूमवाल्यांवर कारवाई करण्यास वाहतूक पोलीस का धजावत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जुनी वाहने खरेदी-विक्री करणारांनीही येथे दुकाने थाटली आहेत. यामुळे येथील वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. वाकड हद्दीत बाह्यवळण मार्गाच्या दुतर्फा अनेक छोटी-मोठी हॉटेल सुरू आहेत. त्यामुळे कात्रजच्या दिशेने येणारी अनेक वाहने येथे थांबतात. महाविद्यालयीन विद्यार्थीदेखील यात असतात. काही फेरीवाल्यांनी येथे अतिक्रमण केले आहे.
वाकड येथील भुजबळ पुलाजवळ पूर्वीच्या जकात नाक्याच्या आवारात अनधिकृतपणे कंटेनर, टेम्पो व ट्रक उभे असतात. ही अवजड वाहने बेशिस्तपणे पार्किंग केलेली असतात. यामुळे गर्दीच्या वेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. भुजबळ चौकात खासगी ट्रॅव्हलच्या बुकिंगची दुकाने थाटून काही एजंटनी जागा बळकावली आहे. येथे तिकीट काढण्यासाठी गर्दी होत असते. त्यामुळेही वाहतुकीस अडथळा होत आहे. यावर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.