वन्य प्राण्यांचा वाढला मानवी वस्तीमध्ये वावर, याला नेमके जबाबदार कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:53 AM2018-12-18T02:53:05+5:302018-12-18T02:53:35+5:30
मावळ तालुक्यातील दुर्गम भाग : वाढत्या शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे परिसरातील डोंगर झाले ओस
चंद्रकांत लोळे
कामशेत : मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र आहे. येथे मोठ मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु वाढत्या शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, हळूहळू ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी प्रमुख कारणांसह जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्यात येत असलेला प्राण्यांचा निवारा आदी कारणांमुळे जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.
स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना धोका निर्माण होऊ लागला असल्याने याला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना उपस्थित करत आहे. मावळ तालुक्यातील नाणे, पवन, आंदर मावळामध्ये मोठी धरणे असून, नाणे मावळात शिरोता व वडिवळे, पवन मावळात पवना, आंदर मावळात आंद्रा आदी धरणे व छोटे मोठे तलाव, नद्या व इतर जलाशय आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई व दाट जंगले आहेत. या भागांमध्ये अनेक लहान मोठी गावे वाड्या वस्त्या असून, येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांचाच उदरनिर्वाह हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. बेसुमार उत्खनन आदींमुळे मावळातील अनेक डोंगर टेकड्या नामशेष होत आहेत. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने नाणे मावळातील भाजगाव येथे दोन शेळ्या, साई येथे वासरू व इतर पाच पाळीव प्राणी व इतर अनेक प्राण्यांचा फडशा पडला होता. तर ताजे गावाच्या जवळ एका आश्रमात कुत्र्यावर हल्ला तसेच उंबरवाडी येथील डोंगर पठारावरील धनगर वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला होता. याशिवाय अन्य वन्यप्राणी शेतीचे मोठे नुकसान करत आहेत.
टाकवे खुर्द गावाच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या (नर मादी व दोन बछाड्यांचा) वावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हे रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाहीत. आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत आहेत. त्यात या भागात मेंढपाळाचा मुकाम असताना
रात्रीच्या वेळी बिबट्याने एका घोड्याचा फडशा पाडला.
हा घोड्याला पुन्हा खाण्यासाठी
येईल म्हणून वन्यजीव रक्षक अनिल आंद्रे व त्यांच्या सहकाºयांनी दोन दिवस येथे खडा पहारा दिला.
मात्र त्यांना बिबट्या सापडला नाही; पण वन्य प्राण्यांची शिकारी करणारे अनेक जण भेटले. या भागातील उंबरवाडी येथील डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे या आधीही प्रकर्षाने समोर आले आहे.
शिकारीच्या प्रकारात वाढ
४दुर्गम भागातील ठरावीक गावांमध्ये शासनाने संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने दिले आहेत. त्याचा विधायक कामांसाठी उपयोग न करता शिकारी करणे, पाहुणे मंडळींना व व्यावसायिक शिकारी करणाºया लोकांना बोलावून रानात शिरून शिकार करून पार्ट्या करणे, वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करणे आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
या भागात सध्या बिबट्याचा वावर आहे. मात्र तो जंगलात आहे गावांमध्ये नाही. शिवाय या बिबट्याने मानवी वस्ती अथवा माणसावर हल्ला केला नाही. या भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर झोपू नये, रात्रीच्या वेळी एकट्याने रस्त्यावर ये-जा करू नये. तसेच आपल्या भागात बिबट्या दिसल्यास फटाके वाजवावेत व वन विभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. संजय मारणे, वन क्षेत्रपाल
मावळात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांची हत्या शिकारी करत आहेत. हिंस्र प्राण्यांना अन्नाचा तुटवडा होत आहे. बेसुमार वृक्षतोड शिवाय पाण्याचे स्त्रोत संपुष्टात येत असल्याने व मानवाचे जंगलात वास्तव्य वाढल्याने वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. वन विभागाने स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून डोंगर पठार आदी ठिकाणी जलस्रोत, वृक्षसंवर्धन व लागवड यावर भर देणे गरजेचे आहे.
- अनिल आंद्रे, वन्यजीव रक्षक
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी वन विभागाने ग्रामपंचायत व स्थानिकांना सूचना केल्या आहेत. वन विभाग हा परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी एकटे फिरू नका, लहान मुलांना बाहेर सोडू नका, घराबाहेर झोपू नका आदी सूचनांचे पत्र दिले असून, यासंबंधी ग्रामस्थांना कळवले आहे. वनविभागाकडून ग्रामपंचायतीला सूचना आल्या आहेत. त्यानुसार ग्रामस्थांना माहिती दिली आहे.
- वैदेही रणदिवे, सरपंच
खांडशी ग्रुप ग्रामपंचायत