माझ्या आईच्या मृत्युला कोण जबाबदार ? आयसीयुमध्ये जागा असताना देखील उपचार केलेच नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 05:30 PM2020-07-20T17:30:59+5:302020-07-20T18:57:24+5:30
पिंपरी चिंचवडमधील एका बड्या रुग्णालयातील प्रकार
पिंपरी : आठवड्यातून तीन वेळा आईला डायलिसीससाठी 'त्या' रुग्णालयात घेऊन जायचो. चार वर्ष डायलिसीस सुरू होते. शनिवारची गोष्ट वेगळी होती. आईला जुलाब, उलट्यांचा त्रास सुरु झाला. यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला. डॉक्टरांनी आयसीयुमध्ये भरती करण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्याची अट घातली. त्याशिवाय ते आयसीयु मध्ये दाखल करुन घेण्यास राजी नव्हते. ती चाचणी होण्यापूर्वी आईचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी रुग्णालयाच्या बदलत्या नवीन नियमावलीचे व धोरणाचे कारण पुढे केले. मात्र या सगळयात माझ्या आईचा जीव गेला. याला जबाबदार कोण ? असा प्रश्न मुलाने रु ग्णालय प्रशासनाला विचारला आहे.
आदित्य परब (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) एका खासगी कंपनीत काम करतो. त्याची आई सविता अर्जुन परब (वय 56) या गेल्या चार वर्षांपासून एका खासगी रुग्णालयात डायलिसीस करुन घेत होत्या. शनिवारी देखील नेहमीप्रमाणे त्या उपचार करुन घेण्यासाठी आल्या होत्या. या प्रकरणाविषयी अधिक माहिती देताना आदित्य म्हणाला, त्यावेळी त्यांना 2016 पासून आईला उपचारासाठी त्या ह्यबडयाह्ण रुग्णालयात नेत असु. शनिवारी देखील त्यांना नेले असताना तिला जुलाब व उलट्यांचा त्रास सुरु झाला. यात रक्तदाब वाढला. डॉक्टरांनी आयसीयु मध्ये दाखल करावे लागेल असे सांगताना कोरोनाची चाचणी करावी लागेल. असे सांगितले. यात त्यांनी पेशंटला डिस्चार्च देखील दिला. वास्तविक आई लॉकडाऊन सुरु झाल्यापासून त्याच रुग्णालयात डायलिसीससाठी जात होती. त्यावेळी डॉक्टरांनी कोरोना चाचणी विषयी विचारणा केली नव्हती. परंतु आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णाला आयसीयुमध्ये दाखल करुन उपचार सुरु करण्याऐवजी त्यांनी नियमांवर बोट ठेवले.
कोरोना तपासणी केल्याशिवाय रुग्णाला आयसीयुमध्ये नेणार नसल्याचे संबंधित डॉक्टरांनी सांगितले. त्यानंंतर लहान भाऊ अजिंक्य परब याच्याकडे डिस्जार्ज दिल्याची कागदपत्रे देण्यात आली. जो रुग्ण चार वर्षांपासून ज्या रुग्णालयात उपचार घेत आहे तेथील डॉक्टरांना त्याची 'हिस्ट्री' माहित नाही असे कसे असु शकेल? असा प्रश्न अजिंक्यने रुग्ण प्रशासनाला विचारला आहे.
.................................
सहा लाखांंची शस्त्रक्रिया दुस-या रुग्णालयात केली 37 हजारांत
आईच्या उपचारात डॉक्टरांक डून जो हलगर्जीपणा झाला त्याबद्द्ल पोलिसांत तक्रार देणार आहे. सर्वसामान्य माणसांना नाडण्याचे काम अनेक मोठी रुग्णालये करत आहेत. पैसे माणूस उभे करेल पण तोपर्यंत उपचार सुरु ठेवा. उपचारासाठी रुग्णालयात जागा असताना उगाचच नियम व धोरणांवर बोट ठेवणे चुकीचे आहे. यापूर्वी देखील आईच्या शस्त्रक्रियेसाठी एका रुग्णालयात विचारणा केली होती. शस्त्रक्रियेचा खर्च 4 ते 5 लाख, आयसीयुचे दर, नर्सिंगचे दर आणि इमर्जन्सी काळात दाखल करुन घेतले याचे वेगळे दर असा एकूण सहा लाख खर्च सांगितला. हीच शस्त्रक्रिया औंध मधील एका रुग्णालयात 37 हजारांत केल्याचे आदित्यने सांगितले.