कुत्र्यांना आवरणार कोण? महापालिकेचे दुर्लक्ष, रावेत-वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:36 AM2017-11-28T03:36:08+5:302017-11-28T03:36:21+5:30
रावेत, वाल्हेकरवाडी, भोंडवेनगर, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कुत्र्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे.
रावेत : रावेत, वाल्हेकरवाडी, भोंडवेनगर, चिंतामणी चौक, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर आदी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशा कुत्र्यांपासून नागरिकांना धोका निर्माण होत असताना या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वेळोवेळी केली जात आहे. महापालिका प्रशासन कोणतीही कारवाई न करता केवळ याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त त्वरित करावा, अशी मागणी चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघाने केली आहे.
निवेदन अनेकवेळा नागरिकांच्या वतीने पालिका प्रशासनास देऊनसुद्धा याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहे़ काही दिवसांपूर्वी प्राधिकरण, रावेत, वाल्हेकरवाडी भागात अशाच मोकाट कुत्र्यांनी दहशत माजवून काही नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते.
परिसरात असणाºया कचराकुंडी शेजारी अशी अनेक कुत्री एकत्र येतात आणि कचºयामधून अन्नपदार्थ शोधत असताना अनेकवेळा त्यांच्यामध्ये भांडणे होत असतात. त्यामुळे कचरा टाकावयास जाणाºया महिलांवर ही कुत्री धावून जातात. त्यामुळे महिलांमध्ये घबराट आहे. त्याचबरोबर जवळून जाणाºया नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असतात, अशा कुत्र्यांची दहशत परिसरामध्ये निर्माण झाली आहे. कुत्री दुचाकी वाहनचालकांच्या मागे धावत सुटतात़ त्यामुळे वाहनचालक गडबडून जाऊन बºयाच वेळा अपघात होऊन किरकोळ व गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. अशा कुत्र्यांना पकडून नेण्यासाठी परिसरातील नागरिक अनेक वेळा प्रशासनास फोन करतात़ परंतु कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे़ अशा कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने त्वरित करावा.
विद्यार्थ्यांना होतोय त्रास
परिसरात चायनीज खाद्यपदार्थ सह इतर अन्नपदार्थ व्यावसायिक कचराकुंडी आणि इतरत्र टाकत असल्याने मोकाट कुत्र्यांमुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिक भयभीत झालेत. विशेषत: विद्यार्थ्यांना शाळेत जाताना व येताना या कुत्र्यांचा त्रास होत असल्याने मुलांबरोबर पालकही चिंतेत आहेत. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसराला कोणीही लक्ष देत नसल्याने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कोण करणार हा खरा प्रश्न आहे. मोकाट कुत्र्यांबाबत कधीतरी पालिका प्रशासन मोहीम राबवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जातो. त्यानंतर मात्र कोणीही लक्ष न दिल्याने मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. निदान लोकांच्या सुरक्षेसाठीतरी पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
साफसफाई करण्याची आवश्यकता
कुत्रे पकडण्याची यंत्रणा जशी कमकुवत आहे, तशीच पालिकेची शहरातील सार्वजनिक साफसफाईची परिस्थितीही गंभीरच आहे. दिवसेंदिवस पडून राहणारा कचरा कुत्र्यांच्या टोळ्या निर्माण करण्यास कारणीभूत ठरतो. कचराकुंडीच्या आजूबाजूलाच कुत्र्यांचा वावर असतो. अनेक वसाहतींमध्ये उघड्यावर मांस विक्री होते, मांसाचे तुकडे रस्त्यावर इतरत्र टाकले जातात. कुत्र्यांसाठी हे तुकडे आकर्षणाचा विषय ठरतात. कचरा आणि उघड्यावरची मांसविक्री यावर पालिकेने कठोरपणे निर्बंध घातले तर मोकाट कुत्र्यांवरही निर्बंध बसेल. पालिकेच्या प्रशासनाला कुत्रे पकडण्यात अपयश येत असल्याचा टाहो फोडत पालिकेला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्यापेक्षा कुत्रे पकडण्याची मोहीम कशी प्रभावीपणे होऊ शकेल, याकडे लक्ष दिले तर नागरिकांना दिलासा मिळेल़ कुत्रे मारण्याची परवानगी नाही.
परिसरातील विविध कॉलन्यांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करणे आवश्यक आहे. - रमेश पिसे, अध्यक्ष, इपीएस पेंशनर्स
संघटना, पिंपरी-चिंचवड शहर
शहरासह उपनगरातील कुत्र्यांची वाढती संख्या व त्यावर केले जाणारे उपाय यात मोठी तफावत आहे. मुळात मोकाट कुत्र्यांची समस्या सामान्य नागरिकांची समस्या आहे, असे पालिकेच्या प्रशासनाला वाटते का हाच खरा प्रश्न आहे. विस्तारणाºया शहरात मोकाट कुत्रे पकडण्यासाठी पालिकेकडे सक्षम यंत्रणाच नाही. - सदाशिव जाधव, अध्यक्ष, चिंतामणी ज्येष्ठ नागरिक संघ वाल्हेकरवाडी