येऊन येऊन येणार कोण?
By admin | Published: February 20, 2017 03:01 AM2017-02-20T03:01:28+5:302017-02-20T03:01:28+5:30
महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचारातील राजकीय नेत्यांच्या धडाडणाऱ्या भाषणांच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचला
पिंपरी : महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचारातील राजकीय नेत्यांच्या धडाडणाऱ्या भाषणांच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचला थंडावल्या. गेल्या दोन आठवड्यापासून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना, मनसे, एमआयएम आदी राजकीय पक्षांच्या आणि अपक्षांच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली. रविवार सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांनी रोडशो, सभा, कोपरा सभा, रॅलीवर भर दिला. ‘येऊन येऊन येणार कोण...’च्या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.
महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान येत्या मंगळवारी (दि. २१) होत आहे. उमेदवारी माघारीनंतर महापालिकेतील ३२ प्रभागांसाठीच्या १२८ जागांसाठी सुमारे ७७३ उमेदवार रिंगणात होते. माघारीनंतर निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरायला सुरुवात झाली होती.
राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या सभा गाजल्या. या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारकांची संख्या अत्यल्प होती. राज्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली.
जाहीर प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी मतदारसंवादावर भर दिला. सकाळपासून प्रभागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची फेरी काढली होती. पुढे पक्षाच्या उमेदवारांची माहिती देणारे भोंगे, त्यापाठोपाठ जिप्सीत उमेदवार, त्यापाठोपाठ शेकडो दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकाचौकांत आणि सोसायट्या-सोसायट्यांमध्ये गेल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी, येऊन येऊन येणार कोण... या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
दिवसभर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विविध भागात रोड शो व प्रचारफेरी झाली. प्रचार सांगतेची वेळ जवळ येऊ लागली, तसतसा रोड शोचा वेग वाढला. सायंकाळी साडेपाचपर्यंत रोड शो सुरू होते. तर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या कोपरा सभाही झाल्या. (प्रतिनिधी)
उमेदवारांनी घेतली खबरदारी
३२ प्रभागांमध्ये पदयात्रा झाली. दोन किंवा तीन पक्षांच्या पदयात्रा समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली. त्या अनुषंगाने प्रभागातील पुतळा, देवाचे मंदिर किंवा मुख्य चौकापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. रॅलीच्या सर्वात पुढे पॅनलमधील उमेदवार, त्या पाठोपाठ महिला कार्यकर्त्या आणि नंतर पुरुष कार्यकर्ते असे बहुतांश रॅलीचे स्वरूप होते. प्रभाग मोठे असल्यामुळे प्रमुख मार्गांचीच निवड करण्यात आली होती. पदयात्रेमधील तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. शिवजयंती आणि प्रचाराचा अंतिम दिवस एकच असल्यामुळे अनेक ठिकाणी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या. संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचा कार्यकर्त्यांनी निश्चय केला होता.
जेवणावळींना ऊत
प्रत्येक प्रभागात जेवणावळींना ऊत आला होता. एखादे मंगल कार्यालय किंवा मोठे मैदानाच्या ठिकाणी बेत आखला होता. या ठिकाणी शक्यतो शाकाहारी भोजन होते. मात्र, रात्री अनेक ठिकाणी सामिष बेत होता. अनेक ठिकाणी गोड-धोड पदार्थ आणि मिनरल वॉटरची सोय होती. शिवाय पदयात्रेत अल्पोपाहाराच्या पाकिटांचे वाटप केले. भोजनानंतर काही ठिकाणी आईस्क्रीम, थंड पेय यांची स्वतंत्र सोय होती.
फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपवर प्रचार
प्रभागातील पॅनलमधील उमेदवारांनी एकत्रित पदयात्रा काढली. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोरांची काहीशी अडचण झाली. परंतु, आयात कार्यकर्त्यांच्या बळावर अनेक अपक्षांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. मिळालेले चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची दमछाक झाली. काही अपक्षांनी पदयात्रा न काढता चार-पाच कार्यकर्त्यांसह घरोघरी संपर्कावर भर दिला. तसेच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपवर प्रचार सुरू होता.