‘तू आमच्या घरात का आली’, पत्नीला चावा घेतल्याने पतीवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: January 16, 2024 04:54 PM2024-01-16T16:54:15+5:302024-01-16T16:54:54+5:30
पत्नीला आणि तिच्या आई, भावालाही मारहाण करून जखमी केले
पिंपरी : कपडे घेऊन जाण्यासाठी घरी आलेल्या पत्नीला पती आणि त्याच्या नातेवाईकांनी मारहाण केली. यात पतीने पत्नीचा कान तोडून व हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी पतीसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पिंपरीगावातील विठ्ठलनगर येथे रविवारी (दि. १४) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली.
राहुल निळकंठ रामपुरे (२७, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) आणि इतर सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल याच्या पत्नीने याप्रकरणी सोमवारी (दि. १५) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला, त्यांची आई आणि भाऊ यांना घेऊन स्वतःचे कपडे आणण्यासाठी पतीच्या घरी आल्या. ‘‘तू आमच्या घरात का आली’’, असे म्हणून पतीने त्यांना पोटात लाथ मारली. तसेच हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. यात पतीने फिर्यादी महिलेचा डावा कान तोडून तसेच डाव्या हाताच्या करंगळीला चावा घेऊन जखमी केले. फिर्यादी महिलेच्या आई आणि भावाला देखील मारहाण करत जखमी केले.