उत्पन्नवाढीसाठी पालिकेने कंबर कसली
By admin | Published: November 6, 2014 11:44 PM2014-11-06T23:44:34+5:302014-11-06T23:44:34+5:30
गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नामध्ये घट येत असल्याने पालिकेला नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे,
पुणे : गेल्या काही वर्षांत महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नामध्ये घट येत असल्याने पालिकेला नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे, तसेच उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजना राबविण्याच्या दृष्टिकोनातून रेव्हेन्यू कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष महापौर असून, उपाध्यक्ष उपमहापौर असतील. तर, प्रत्येक पक्षाचे दोन नगरसेवक समितीमध्ये असतील. उपमहापौर आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
ही समिती केवळ उपाय सुचविणार असून, तिला कोणतेही अधिकार राहणार नसल्याचे बागूल यांनी
स्पष्ट केले.
महापालिकेमध्ये विविध समित्या आहेत, तर पालिकेची आर्थिक धुरा सांभाळणाऱ्या स्थायी समितीकडून जमा-खर्चाचा लेखा पाहून विकासकामांसाठी खर्च केला जातो. मात्र, महापालिकेमध्ये उत्पन्नवाढीचा विचार करण्यासाठी कोणतीही
समिती नाही. त्यामुळे उपमहापौर आबा बागुल यांनी रेव्हेन्यू कमिटीची स्थापना करावी, असा प्रस्ताव दिला होता.
हा प्रस्ताव ६ महिन्यांपूर्वी मुख्य सभेने मान्य केला होता. मात्र, अद्याप समितीची स्थापना झाली नसल्यामुळे लवकरात लवकर समिती स्थापन करावी, अशी मागणी बागुल यांनी केली होती. त्यानुसार, ही कमिटी स्थापन करण्याचे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिले आहेत. त्यानुसार, रेव्हेन्यू कमिटीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन नगरसेवक असतील. त्यामुळे गटनेत्यांना महापौरांनी पत्र देऊन दोन सदस्यांची नावे कळवावीत, अशी विनंती केली आहे. पालिकेला सध्या मिळकतकर, बांधकाम विभाग आणि एलबीटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळत आहे.
मिळणारे उत्पन्न अपुरे आहे. त्यामुळे नवीन उत्पन्नाच्या स्रोतांचा शोध घेण्यासाठी रेव्हेन्यू कमिटी काम करेल. जकात बंद करून एलबीटी लागू करण्यात आला आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यापाऱ्यांना एलबीटी बंद करू, असे आश्वासन दिले
आहे. त्यामुळे भविष्यात
उत्पन्नाची समस्या निर्माण होऊ
शकते. यासाठी रेव्हेन्यू कमिटी नवीन पयार्यांचा विचार करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. (प्रतिनिधी)