परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 04:44 AM2018-04-23T04:44:57+5:302018-04-23T04:44:57+5:30

ल. म. कडू : मराठीतील सर्वोत्तम साहित्याचा वाचनानंद घ्यावा...

Why foreign literature is read as scholar? | परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

परदेशी साहित्य वाचले म्हणजे विद्वान का?

googlenewsNext

आपल्याकडे एखाद्या वक्त्याने त्याच्या भाषणात दोन-चार इंग्रजी पुस्तकांचा उल्लेख केला की श्रोता कमालीचा सुखावतो. आता त्या वक्त्याने परदेशी साहित्य वाचलं म्हणजे तो विद्वान झाला का? हा प्रश्न आपण कधी स्वत:ला विचारत नाही. सध्या काय वाचताय असं सहजच कुणाला विचारलं अन् त्याने मी अमूक अशा लेखकाची इंग्रजी कादंबरी वाचतो आहे असे सांगितल्यास आपल्याला त्या व्यक्तीबद्दल कुतूहल वाटते. मुद्दा इंग्रजी वाचनाचा मुळीच नाही. ते वाचन तर हवेच मात्र ते करत असताना आपल्या साहित्याकडे दुर्लक्ष व्हायला नको.

दिवसेंदिवस वाचनाचा बेगडीपणा वाढत चालला आहे. मुळात आपल्याकडे वाचन हा एकप्रकारचा वाचनसंस्कार असतो हे कुणी लक्षात घ्यायला तयार नाही. ज्याप्रमाणे मुंजीचा संस्कार आहे तसा वाचनाचा संस्कार का असू नये, हा प्रश्न पडतो. वाचनाचे प्रमाण आजकाल कमी होत चालले आहे हे काही अंशी खरे आहे. तरुण वाचतो आहे ही समाधानकारक बाब म्हणावी लागेल. आपण ज्यापद्धतीने सणवार साजरे करतो, एखाद्याला मंगलप्रसंगी काही भेटवस्तू देतो त्याप्रमाणे पुस्तके भेट देण्यास प्राधान्यक्रम द्यायला हवे. वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न व्हायला हवेत. नाहीतर वाचनाबद्दलचे सुविचार, केवळ भाषणापुरतेच मर्यादित राहतील.
लोकांपर्यंत पुस्तक पोहोचण्याकरिता वाचक, प्रकाशक म्हणून आपली भूमिका काय, याचा आपण विचार केल्यास वाचनाप्रति अधिक सजगता वाढण्यास मदत होईल. वाचनाबद्दलची जागरूकता वाढण्याकरिता काही उपाय सुचवावेसे वाटतात. खेळण्याच्या वयात मुलांच्या हातात पुस्तके पडल्यास पुढे त्यांना पुस्तके वाचा असे दरवेळी सांगण्याची गरज पडत नाही. मात्र आपल्याकडे याबाबत चित्र उलटे पाहायला मिळते. याकरिता केवळ त्या लहान मुलांना दोष देण्यापेक्षा पालक म्हणून आपण काही करणार आहोत की नाही? हा मुख्य प्रश्न आहे. कुमारवयात सक्तीने म्हणा किंवा शिस्तीने त्या मुलांना वाचण्यास प्रवृत्त केले जाते. परंतु त्यांना वाचनाची गोडी लागत तर नाहीच, दुसरीकडे त्यांच्या मनात वाचनाबद्दल कमालीची नकारात्मकता वाढीस लागते. म्हणूनच लहानपणापासूनच पालकांनी जाणीवपूर्वक वाचनसंस्कारासाठी प्रयत्न केल्यास वाचन हा सवयीचा भाग होऊन जाईल. तो आनंदाचा प्रवास असेल. त्यातूनच उद्याची वाचकाची पिढी तयार होईल. आता झाले असे, की आपण सगळे जण कमालीचे उपयुक्ततावादी झालो आहोत. प्रत्येक गोष्टीत स्वत:करिता महत्त्वाचे काय आहे, याचा विचार प्रथम करतो. कला हे माध्यम आपल्याला आनंदीपणाने जगण्यासाठी आधार देते. आत्मविश्वासाने जगण्याकरिता कला उपयोगी पडते. आता आपण त्याकडे उपयुक्ततावाद म्हणून पाहायला लागल्याने त्याचे महत्त्व कमी झाले आहे. याबद्द्ल सांगायचे झाल्यास, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे ना, मग फक्त त्यासंदर्भात पुस्तके वाचावीत. बाकी वाचून काय उपयोग? ललित वाङ्मय यात काय आहे? हीच बाब शाळेतील अभ्यासक्रमाबाबत सांगता येईल.
शाळेत ग्रंथालयाचा विद्यार्थी घेत असलेला लाभ याबाबत अभ्यास व्हायला हवा. अभ्यासक्रमाच्या बाहेरचे काही वाचायचे नाही. मग गाईडसंस्कृती आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर वाढली. इतका कमालीचा उपयुक्ततावाद आपल्यात भिनत चालला आहे. मराठी साहित्यात सुंदर ग्रंथ आहेत. त्याचा आस्वाद घ्यावा, त्याचे वाचन करावे, भाषेविषयी कुठली असूया नाही. इथे इंग्रजी आणि मराठी वाददेखील नाही. जागतिक समग्रता आणि भान येण्यासाठी ते वाचन महत्त्वाचे ठरते. मात्र त्याबरोबर आपल्या साहित्यातील श्रेष्ठत्व समजून घेणे गरजेचे आहे. केवळ परदेशी कथा, कादंंबऱ्या चांगल्या आणि आपल्या भाषेतील साहित्य निरस ठरवणे चुकीचे आहे. आपल्या साहित्यात समृद्धता आहे. त्यासाठी आपण वेळ काढून ते साहित्य वाचण्याचे कष्ट घ्यायला तयार आहोत का? हा प्रश्न आहे. आपल्या भाषेतील वाचनसंस्कृती वाढण्यासाठी वाचक म्हणून आपण काय भूमिका घेणार, याचा विचार वाचकाने करावा.

Web Title: Why foreign literature is read as scholar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.