पिंपरी-चिंचवड पोलिसांचे ‘रँकिंग’ का घसरले? ‘सीसीटीएनएस’ गुणांकनात घसरगुंडी
By नारायण बडगुजर | Published: April 22, 2023 02:30 PM2023-04-22T14:30:43+5:302023-04-22T14:31:24+5:30
गेल्या वर्षी पहिल्या २० क्रमांकांमध्ये असलेले शहर दल फेब्रुवारी २०२३ च्या गुणांकनात ३४ व्या क्रमांकावर आहे...
पिंपरी : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यात क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) प्रणाली विकसित करण्यात आली. या प्रणालीनुसार राज्यातील पोलिसांचे मासिक गुणांकन केले जात आहे. यात पिंपरी-चिंचवड पोलीस दलाला मोठी भरारी घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे न होता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या गुणांकनात शहर पोलिस दलाची घसरण झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या २० क्रमांकांमध्ये असलेले शहर दल फेब्रुवारी २०२३ च्या गुणांकनात ३४ व्या क्रमांकावर आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पोलिसांचे कामकाज सुसह्य होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी ‘सीसीटीएनएस’च्या माध्यमातून पोलिसांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जात आहे. चांगली आणि चमकदार कामगिरी करणाऱ्या पोलिसांच्या घटकाचे गुणांकन होत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणे आहेत. या सर्व ठाण्यांतील सर्व प्रकारचे गुन्हे, तक्रार अर्ज, बेपत्ता- हरवले आदींची ऑनलाईन नोंद करण्यात येत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास केल्यानंतर त्याचा तपास, आरोपींचा शोध, तक्रारींचा निपटारा आदींबाबत देखील सीसीटीएनएस प्रणालीत ऑनलाईन माहिती नोंद केली जाते.
गुणांकनात ३४२ पैकी १५० गुण
‘सीसीटीएनएस’च्या डिसेंबर २०२१ अहवालानुसार पोलिसांच्या राज्यातील ४६ घटकांमध्ये पिंपरी-चिंचवड पोलिसांचा २४ वा क्रमांक होता. यात गुणांकनात १७२ पैकी १२० गुण मिळवून ७० टक्के सरासरी कामगिरी केली होती. मात्र यंदा त्यात घसरण झाली. सीसीटीएनएसच्या फेब्रुवारी २०२३ अहवालानुसार राज्यातील ४६ घटकांमध्ये शहर पोलिसांचा ३४ वा क्रमांक आहे. गुणांकनात ३४२ पैकी १५० गुण मिळवून ४४ टक्के सरासरी कामगिरी केली आहे.
काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
देशभरातील गुन्ह्यांची तसेच गुन्हेगारांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. यात गुन्ह्यांची, गुन्हेगारांची माहिती ऑनलाईन नोंदविली जाते. या यंत्रणेला सीसीटीएनएस प्रणाली म्हणून ओळखले जाते. या प्रणालीमुळे देशभरातील गुन्हेगारांची माहिती पोलिसांना एकाचवेळी उपलब्ध होते. त्यामुळे गुन्ह्यांची उकल करणे, गुन्हेगारांचा शोध घेणे सुसह्य झाले आहे.
पोलिस उपायुक्तांकडे जबाबदारी
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलिस उपायुक्तांकडे ‘सीसीटीएनएस’ प्रणालीची जबाबदारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रणालीबाबत प्रत्येक पोलिस ठाणे निहाय नियमित इन्स्पेक्शन होणे आवश्यक आहे. तसेच या प्रणालीत चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने गुणांकनात घसरण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
नुसताच गाजावाजा; प्रत्यक्षात बोजवारा
‘सीसीटीएनएस’ प्रणालीत गेल्या वर्षीपर्यंत कामगिरी उंचावत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे. कामगिरी केल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नुसताच गाजावाजा होत असून प्रत्यक्षात बोजवारा उडाल्याचे गुणांकनावरून दिसते.
आयुक्तालय स्तरावर उदासीनता
‘सीसीटीएनएस’ प्रणाली ही अद्यायावत तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे गुन्हेगारी व गुन्हेगारांचे राष्ट्रीय डेटाबेस विकसित करण्यात मदत होते. त्या अनुषंगाने एफआयआर नोंदणी, अन्वेषण आणि पोलिस ठाण्यांमध्ये चार्जशीटशी संबंधित डेटाचे डिजिटायझेशन करण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त आहे. मात्र, या अद्ययावत प्रणालीबाबत आणि तंत्रज्ञानाबाबत पोलिस आयुक्तालय स्तरावर उदासीनता दिसून येते.
आयटी पार्क असूनही आयुक्तालय तंत्रज्ञानात मागे
आयटी पार्कमुळे ‘टेक्नोसॅव्ही’ शहर अशी पिंपरी-चिंचवडची ओळख आहे. त्या अनुषंगाने शहरातील इतर यंत्रणा देखील तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रेसर आहेत. मात्र, पोलिस आयुक्तालयाकडून याबाबत प्रचंड नकारात्मकता दिसून येते. त्यामुळे ‘सीसीटीएनएस’ गुणांकनात आयुक्तालय मागे पडले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.