महामार्गावर वाकड चौकात का होतेय वाहतूक कोंडी? हिंजवडी, पुण्याकडे जाणाऱ्यांना डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 01:48 PM2023-09-06T13:48:44+5:302023-09-06T13:50:57+5:30
त्यामुळे वाकड चौकातील कोंडी नित्याचीच झाली...
पिंपरी : सकाळी साडेनऊची वेळ. मुंबई-बंगळुरू महामार्गाने निघालेल्या वाहनांना ब्रेक लागतो, वाकड पुलाजवळ. त्याच वेळी हिंजवडीकडे निघालेली वाहने हिंजवडीच्या अलीकडील चौकाजवळ दचकून थांबतात. पिंपरी-चिंचवड चौकातून हिंजवडीला आणि शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. चार लेनने येणारी सुसाट वाहने दोन लेनचा पूल असल्याने अडकतात. पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणास पत्र देऊनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे वाकड चौकातील कोंडी नित्याचीच झाली आहे.
मुंबई-बंगळूर महामार्ग पिंपरी-चिंचवड शहरातील किवळेपासून वाकड परिसरातून जातो. तो चारपदरी असून दोन्ही बाजूंना सेवामार्ग आहे. द्रुतगती महामार्गावरून किवळेत जुन्या मार्गावर आल्यानंतर चारपदरी मार्गाने वाहने पुण्याच्या दिशेने सुसाट निघतात. प्रतितास साठ ते ऐंशी असा वाहनांचा वेग असतो. मात्र, भूमकर पूल ओलांडल्यानंतर टिपटॉप हॉटेलसमोरील अंडरपासपासून वाहतुकीची कोंडी सुरू होते. पुण्याहून मुंबईकडे जाताना कोंडी नसते. मात्र, पिंपरी-चिंचवडहून पुण्यास जाताना आणि महामार्ग ओलांडताना कोंडीचा सामना करावा लागतो.
पूल ठरलाय निरुपयोगी
पिंपरी-चिंचवड शहरातून वाकडमध्ये आल्यानंतर हिंजवडीकडे जाण्यासाठी पूल उभारला आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुमारे सत्तर हजार अभियंते कामास आहेत. त्यांना सकाळी आणि सायंकाळी कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी वाकड पूल ते हिंजवडीच्या अलीकडच्या चौकामध्ये वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येतात. वाकडमधून महामार्गावर जाण्यासाठी पुलावरून हिंजवडीकडे जावे लागते. अर्ध्या किलोमीटरचा वळसा मारावा लागतो. पुलाखालून काही अंतर पुण्याच्या दिशेने जाऊन अंडरपासने पुन्हा वाकडच्या दिशेने येता येते. या दोन्ही ठिकाणी वाहतूककोंडी होते. हिंजवडीतून वाकडला येण्यासाठी किंवा पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी टिपटॉपसमोरील अंडरपास ओलांडून बालेवाडीच्या दिशेने जावे लागते, तर हिंजवडी-वाकड महामार्गावरील पुलावरून वाकड चौकात यावे लागते. तेथून यू टर्न घेऊन बालेवाडीस जावे लागते किंवा पुढे सरळ औंध रस्त्याने पुण्यास जावे लागते. वाकडमध्ये कोंडीचा त्रास नित्याचा झाला आहे.