पिंपरी-चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून; पतीला सात दिवसांची पोलिस कोठडी
By नारायण बडगुजर | Updated: June 22, 2024 17:45 IST2024-06-22T17:43:44+5:302024-06-22T17:45:02+5:30
देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची ही घटना घडली....

पिंपरी-चिंचवडमध्ये ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून; पतीला सात दिवसांची पोलिस कोठडी
पिंपरी : ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली. त्याना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत खुनाची ही घटना घडली.
प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१), असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा पती जयदीप अर्जुन यादव (वय २९, रा. देहूगाव, मूळ रा. चिखलगोळ, जि. सांगली) याला पोलिसांनी अटक केली. पोलिस अंमलदार किरण राजाभाऊ पाटील यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. २१) देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील सलून व्यावसायिक भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा आणि जयदीप यादव हे दोन महिन्यांपूर्वी विवाहबंनधानत अडकले. प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसस्सीपर्यंत तर जयदीप हा अभियांत्रिकी शाखेतील पदविकाधारक (डिप्लोमा) आहे. जयदीप हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. गेल्या आठवडाभरापूर्वी ते देहूगाव येथे राहण्यासाठी आले होते.
पत्नी शारीरिक संबंध ठेवू देत नाही. तसेच तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय जयदीप याला होता. दरम्यान, प्रतीक्षा आणि जयदीप हे दोघे गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला गेले. तेथे ओढणीने गळा आवळून जयदीप याने तिचा खून केला. तसेच गुन्हा लपविण्यासाठी तिचा व स्वतःचा मोबाइल घटनास्थळा जवळील इंद्रायणी नदीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून प्रतीक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर खणसे तपास करीत आहेत.