मालमत्तेच्या वादातून पत्नी, सासूवर चाकूहल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 02:43 AM2017-09-15T02:43:33+5:302017-09-15T02:43:37+5:30
पत्नीच्या नावे असलेली लातूर येथील पाच एकर शेती आणि काळेवाडी तापकीरनगर येथील दोन सदनिका आपल्या नावे कराव्यात, असा तगादा लावून एकाने पत्नी व सासू यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळेवाडी येथे घडली. रात्री उशिरा याप्रकरणी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.
वाकड : पत्नीच्या नावे असलेली लातूर येथील पाच एकर शेती आणि काळेवाडी तापकीरनगर येथील दोन सदनिका आपल्या नावे कराव्यात, असा तगादा लावून एकाने पत्नी व सासू यांच्यावर चाकू हल्ला केला. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काळेवाडी येथे घडली. रात्री उशिरा याप्रकरणी वाकड पोलिसांकडे गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि कमलाकर तुपेकर (वय ५१, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने केलेल्या चाकू हल्ल्यात पत्नी अनुसया रवि तुपेकर (वय ४५) तसेच सासू सोजरबाई शंकर कोल्हे (वय ६०, दोघीही रा. श्रीराम कॉलनी काळेवाडी) या जखमी झाल्या आहेत. त्यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, लातूर येथील पाच एकर शेती व काळेवाडीतील दोन सदनिका अनुसया यांच्या नावे आहेत. मात्र आपल्या नावावर ही मिळकत करावी, अशी मागणी करीत अरोपी नेहमी त्यांच्याशी वाद घालत असे.
बुधवारी अनुसया आई सोजरबाई कोल्हे या माय-लेकी सायंकाळी आळंदी येथून देवदर्शनाहून परतल्या. काळेवाडीत कॉलनीजवळ उतरून भाजी खरेदी करीत असताना, पाठीमागून आलेल्या आरोपीने ‘‘मी तुम्हा दोघीनांही सोडणार नाही’’ असे म्हणत चाकू हल्ला चढविला. पोटावर, हातावर, तोंडावर सपासप वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मालमत्तेच्या वादातून मारामारीच्या वाढ झाल्याचे दिसत आहे.