अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा दाबून पत्नीचा खून, पतीला अटक; तळवडेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 15:44 IST2024-06-21T15:43:25+5:302024-06-21T15:44:25+5:30
याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास करत असताना राणीदेवी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले...

अनैतिक संबंधाच्या संशयावरून गळा दाबून पत्नीचा खून, पतीला अटक; तळवडेतील घटना
पिंपरी : पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने तिचा गळा व नाक-तोंड दाबून खून केला. ही घटना १६ जून रोजी भाटे वस्ती, देहू-आळंदी रोड, तळवडे येथे घडली. राणी देवी विशाल कुमार (वय १९) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी विशाल कुमार जगत बहादुर (२०, रा. भाटेवस्ती, देहू आळंदी रोड, तळवडे. मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सकाळी भाटेवस्ती, देहू आळंदी रोड, तळवडे येथे राणीदेवी या महिलेचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्या घटनेचा तपास करत असताना राणीदेवी यांचा नैसर्गिक मृत्यू झाला नसून त्यांचा खून झाला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी पती विशाल कुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याचे कबूल केले. राणीदेवी हिचे एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय विशाल कुमार याला होता. त्यावरून त्याने राणीदेवी हिचा राहत्या घरात गळा व नाक-तोंड दाबून खून केला.