घरगुती भांडणातून पत्नीवर चाकूने वार; पतीवर गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: March 26, 2024 05:09 PM2024-03-26T17:09:52+5:302024-03-26T17:10:06+5:30
दाम्पत्य मुळचे बिहार येथील असून रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत
पिंपरी : घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीला शिवीगाळ केली. तसेच चाकूने पोटात वार करून पतीने तिला गंभीर जखमी केले. वाल्हेकरवाडी येथील राशिवले चाळीत सोमवारी (दि. २५) रात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.
नारोदेवी सुमेश राम (वय ३२), असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. सुमेश बुलुचराम (३५, रा. राशिवले चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बिंदूदेवी नरेश राम (३५, रा. राशिवले चाळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेश आणि नारोदेवी हे पती-पत्नी आहेत. त्यांना तीन मुले आहेत. मुळचे बिहार येथील असलेले हे दाम्पत्य रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहे. दोघेही मजुरी काम करतात.
सुमेश आणि नाराेदेवी यांच्यात घरगुती भांडण झाले. या कारणावरून सुमेश याने पत्नी नारोदेवी हिला शिवीगाळ केली. मी तुला मारून टाकणार, असे म्हणाला. तसेच घरातील भाजी कापण्याच्या चाकूने तिला ठार मारण्याच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला केला. यात तिच्या पोटात चाकूने वार केले. गंभीर जखमी झाल्याने नारोदेवी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.