अंधांनी केली अभयारण्याची सैर
By admin | Published: April 25, 2017 04:08 AM2017-04-25T04:08:19+5:302017-04-25T04:08:19+5:30
पुणे येथील प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या माध्यमातून राज्यातील अंधव्यक्तींना जंगल अनुभवता यावे,
चिंचवड : पुणे येथील प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाइंड यांच्या माध्यमातून राज्यातील अंधव्यक्तींना जंगल अनुभवता यावे, यासाठी एका आगळ्या वेगळ्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोल्हापूर जवळील दाजीपूर अभयारण्यात वन्यजीव विभाग यांच्या सहकार्याने या विशेष प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा पार पडला.
संस्थेच्या वतीने ‘प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा या दिवशी संस्थेच्या वतीने आगळा, वेगळा कार्यक्रम आयोजित केला. प्रेरणा असोसिएशन यांच्या संकल्पनेतून व वन्यजीव विभाग कोल्हापूर यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.
या प्रकल्पाच्या माध्यमातून अंध व्यक्तींना जंगल प्रत्यक्ष अनुभवता आले. यासाठी ब्रेल, श्राव्य, स्पर्श, गंध व जंगल सफारी या माध्यमाचा वापर करण्यात आला. अतिशय अनोखा कार्यक्रम व अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा कार्यक्रम अनेक अंध मित्र, प्रेरणा परिवाराचे सदस्य व वन्यजीव विभाग यांच्या उपस्थितीत झाला.
यासाठी वन विभागाचे डॉ. व्ही़ क्लेमेन्ट बेन व सीताराम झुरे यांचे सहकार्य लाभले आहे.
सकाळी ६ ते १० विविध अनुभूतींच्या माध्यमातून प्रत्यक्ष २१ कि.मी़ जंगल सफारी करण्यात आली. जंगलातील विविध भागांत जाऊन अंध मित्रांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. पक्ष्यांचे आवाज, पाणवठा, पालापाचोळा, झाडांचे प्रकार, वन्यप्राण्यांविषयीचे राहणीमान याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळाला.
तेंडुलकर यांच्या जन्म दिवस केक कापून साजरा करण्यात आला. अंध बांधवांनी येथील गवा या प्राण्याची प्रतिकृती तयार केली आहे. ही प्रतिकृती वन्यजीव विभागाकडे सुपूर्त केली असून, यापुढे अंध बांधवांना यातून रोजगार देता येणार असल्याचे संस्थेचे हनुमंत जोशी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी संस्थेचे शर्वरी पाटील, सुनील रांजणे, सुजय कुलकर्णी, दिलावर शेख, शैलेंद्र पांडये, शहाबुद्दीन शेख, सुनंदन लेले, सीमा नवले यांचे सहकार्य लाभले.(वार्ताहर)