बीआरटी मुहूर्तावर धावणार का?
By admin | Published: August 31, 2015 04:01 AM2015-08-31T04:01:31+5:302015-08-31T04:01:31+5:30
अनेक वर्षांपासून प्रलंबित बीआरटी बससेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. औंध-रावेत या मार्गावर पाच सप्टेंबरपासून बस धावणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या
पिंपरी : अनेक वर्षांपासून प्रलंबित बीआरटी बससेवेला अखेर मुहूर्त सापडला आहे. औंध-रावेत या मार्गावर पाच सप्टेंबरपासून बस धावणार आहे, असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. याबाबत महापौर शकुंतला धराडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसह मार्गाची पाहणी करणार आहेत, त्यानंतर याबाबतची घोषणा होणार आहे.
केंद्र सरकारच्या पंडित जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेच्या वतीने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने बीआरटी राबविण्याची घोषणा २००८ मध्ये झाली. त्यानंतर २००९ मध्ये प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली.
दापोडी ते निगडी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता, वाकड ते कासारवाडी, तळवडे ते चऱ्होली फाटा, औंध ते रावेत, टेल्को रोड, नाशिक फाटा ते मोशी, भक्तिशक्ती ते किवळे ते तळवडे, हिंजवडी ते केएसबी चौक, बोपखेल ते आळंदी या शहरातील
दहा मार्गांचे नियोजन करण्यात
आले. दहापैकी एकाही मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. एकाही
मार्गावरून बीआरटी बस
धावण्यास सुरुवात झालेली नाही. पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी हा मार्ग तयार आहे.
बसस्टॉप गंजू लागले आहेत. आजवर साडेतीनशे कोटी रुपये खर्च झाले आहेत.
या मार्गाबाबत न्यायालयाने फटकारल्याने औंध-रावेत हा मार्ग सुरू करण्याची घोषणा आयुक्त राजीव जाधव यांनी केली होती. त्यासही सहा महिने पूर्ण होत आले आहेत. १ मे, जून, जुलै, १ आॅगस्ट, १५ आॅगस्ट असे मुहूर्त निश्चित करण्यात आले. मात्र, काम पूर्ण न झाल्याने हे मुहूर्त पुढे ढकलण्यात आले आहेत. १ आॅगस्टपासून बसची चाचणी सुरू झाली. मात्र, मार्ग आणि त्यावर असणाऱ्या सेवा सुविधांची कामे सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांसाठी ही बससेवा सुरू केलेली नाही.
महापौर शकुंतला धराडे यांनी या प्रश्नी पीएमपी, बीआरटी राबविणारे अधिकारी, महापालिका प्रशासनास धारेवर धरल्यानंतर ५ सप्टेंबरचा मुहूर्त काढण्यात आला आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा महापालिकेने केलेली नाही. महापौर धराडे या सोमवारी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या सेवेचे उद्घाटन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केल्याचे महापालिकेतील सूत्रांनी सांगितले. (संबंधित वृत्त ७)