'आरक्षण घेऊनच येणार...', महिनाभर पुरेल एवढा शिधा घेऊन मराठे मुंबईच्या दिशेने
By प्रकाश गायकर | Published: January 24, 2024 04:51 PM2024-01-24T16:51:15+5:302024-01-24T16:51:51+5:30
राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत...
पिंपरी : आम्ही वाहनांमधून महिनाभर पुरेल इतके अन्नधान्य आणि साहित्य घेऊन निघालो आहे. त्यामध्ये स्वयंपाकासह कपडे, चादरी यांचा समावेश आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठ्यांच्या हक्काचे आरक्षण घेऊनच वापस येणार असा एल्गार मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांनी केला.
राज्यातील धाराशीव, अहमदनगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमधून अनेक मराठा बांधव पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. एक महिना पुरेल इतक्या अन्नधान्यासोबत आवश्यक वस्तूंचा साठा घेऊन ते मुंबईकडे निघाले आहेत.
त्यामधील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला. या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आरक्षण नसल्याने मुलांना नोकरी मिळाली नाही. त्यामुळे आता आरक्षण घेऊनच मागे येणार असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. त्यासाठी शेतातील कामे उरकून ते निघाले आहेत. तसेच जी काही थोडी कामे शिल्लक आहेत ती करण्याची जबाबदारी घरातील महिला मंडळींवर सोपवण्यात आली आहेत. जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईमध्येच राहणार आहेत. तसेच एक महिन्याचे रेशन संपल्यानंतर गावाकडून त्यांना शिधा पुरवण्यात येणार आहे. त्याबाबतची पूर्वकल्पना गावकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यामुळे कितीही दिवस लागले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत बोलताना विष्णू जाधव म्हणाले, “ आम्ही शेतकरी आहे. आमच्याकडे अवघी एक-दोन एकर जमिन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मराठे आरक्षणापासून वंचित आहेत. मात्र, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे आता माघार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही.
मनोज जरांगे पाटील यांच्या रुपाने मराठा समाजाला एक प्रामाणिक नेता मिळाला आहे. या नेत्याचे एक वैशिष्ट्य आहे की हा नेता मॅनेज होत नाही. त्यामुळे या नेत्याच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळणार याची खात्री आहे. त्यामुळे या नेत्याच्या समर्थनार्थ आम्ही सगळे मुंबईला निघालो आहे.
- विश्वंभर पठाडे, मराठा आंदोलक.
माझी दोन मुल घरी आहेत. त्यांनी चांगले शिक्षण घेतले आहे. मात्र, चांगल्या मार्कांनी पास होऊनही त्यांना नोकरी लागली नाही. मला फक्त दोन एकर शेती आहे. ती पण कोरडवाहू आहे. त्यामुळे पुढे दोन मुलांच या शेतीत कसे भागणार हा प्रश्न आहे. माझ्या मुलांच्या भविष्यासाठी मी मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच येणार.
- बाबासाहेब मेंगडे, मराठा आंदोलक