टीव्ही बघणार की काम करणार? महापालिका अधिकाऱ्यांसाठी तब्बल ७ लाखांचे टीव्ही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:13 PM2022-11-30T14:13:35+5:302022-11-30T14:13:47+5:30
अधिकाऱ्यांच्या हट्टासाठी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठे टीव्ही संच लावण्यात येणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये टीव्ही लावण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिका तब्बल ७ लाखांचा खर्च करणार आहे. हे टीव्ही महापालिका अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या समोर लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता अधिकारी काम करणार की टीव्ही बघणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
अधिकाऱ्यांच्या हट्टासाठी महापालिकेच्या विविध विभागांमध्ये मोठे टीव्ही संच लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये ५५ इंची आठ, ७५ इंची १ व ३२ इंची १ टीव्ही खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी मध्यवर्ती भांडार विभागाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यामध्ये आठ ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तीन ठेकेदार पात्र झाले आहेत. त्यानुसार, मे. इंदू इन्फोटेक सोल्युशन, भोसरी यांच्याकडून ५५ इंची टीव्ही ६३ हजार १५० रुपये दराने खरेदी करण्यात येणार आहे. तर ३२ इंची टीव्ही १७ हजार ७८६ रुपये दराने घेण्यात येणार आहे. त्यासोबतच ७५ इंची टीव्ही १ लाख ५७ हजार ६९८ रुपये याप्रमाणे मे. मोनार्च टेक्नॉलॉजी पुणे यांच्याकडून खरेदी करण्यात येणार आहे. हे टीव्ही संच घेण्यासाठी ६ लाख ८० हजार ६८४ रुपये इतका खर्च येणार आहे. त्याला आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली.
महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मोठ-मोठे टीव्ही संच लावण्यात आलेले आहेत; मात्र हे टीव्ही नेहमी बंदच असतात. चौथ्या मजल्यावरील अतिरिक्त आयुक्त एक व दोन यांच्या केबिनमधील टीव्ही संच सुरू आहेत. बाकी इतर विभागातील टीव्ही बंद आहेत. असे असताना प्रशासनाने पुन्हा नव्याने टीव्ही संच खरेदी केले आहेत.