तरुणपण कारागृहात घालवणार का? विधीसंर्षित बालकांसाठी पोलिसांचा पुढाकार
By नारायण बडगुजर | Published: August 22, 2022 10:37 AM2022-08-22T10:37:01+5:302022-08-22T10:40:01+5:30
आठ मुले देणार दहावीची परीक्षा....
पिंपरी : अजाणतेपणी गुन्हेगारी कृत्य घडलेली अल्पवयीन मुले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळण्याची दाट शक्यता असते. यातून त्यांचे तरुणपण कारागृहातच जाते. हे टाळण्यासाठी अशा विधीसंघर्षित बालकांसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष बाल पोलीस पथकाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामुळे सकारात्मक बदल होत असून विधीसंघर्षित बालकांना आयुष्य जगण्याची नवी वाट मिळण्यास मदत होत आहे.
विशेष बाल पोलीस पथकाचे प्रमुख असलेेले सहायक पोलीस आयुक्त डाॅ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात उपक्रम राबविले जात आहेत. पथकाचे समन्वय पोलीस अंमलदार कपिलेश इगवे यांच्याकडून संयोजन केले जात आहे. पथकाकडून विधीसंघर्षित बालकांचे समुपदेशन तसेच व्यसनमुक्ती केली जात आहे. मुस्कान संस्थेच्या माध्यमातून पीडित अल्पवयीन मुलींना शासनाची मदत तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी बाल पोलीस पथकाकडून पुढाकार घेतला जात आहे.
विधीसंर्षित ३८० मुलांचे समुपदेशन
बाल पोलीस पथकाकडून विधीसंघर्षित ३८० मुलांचे समुपदेशन करण्यात आले आहे. तसेच १५ मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे. निगडी येथे व्यसनमुक्ती केंद्र कार्यान्वित करून त्यात विधीसंघर्षित ३३ मुलांवर व्यसनमुक्तीसाठी मोफत उपचार तसेच समुपदेशन करण्यात येत आहेत.
आठ मुले देणार दहावीची परीक्षा
विधीसंघर्षित मुलांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र उद्योजकता महामंडळाच्या मार्फतीने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. यातील आठ मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या असून, ती मुले दहावीची परीक्षा देणार आहेत.
फुटबाॅलपटू म्हणून ओळख
विधीसंघर्षित बालकांसाठी निगडी येथे महापालिकेकडून दोन मैदान उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे बालकांना फुटबाॅलचा सराव करता येतो. ही मुले राज्यस्तरावर खेळली. उत्कृष्ट फुटबाॅल संघ म्हणून त्यांना बक्षीस देण्यात आले. या फुटबाॅल संघात दिशा भरकटलेली तसेच विधीसंघर्षित मुलांचा समावेश आहे.
पीडित बालकांचा जबाब भयमुक्त वातावरणात नोंदता यावा यासाठी निगडी, हिंजवडी आणि दिघी या पोलीस ठाण्यांमध्ये बालस्नेही कक्ष सुरू केले आहेत. दिशा भरकटलेल्या आणि विधीसंघर्षित बालकांना प्रवाहात आणण्यासाठी पथकाकडून उपक्रम राबविले जात आहेत.
- डाॅ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त
वस्तीपातळीवर जाऊन विधीसंघर्षित बालकांशी संवाद साधला जातो. पथकाच्या माध्यमातून या मुलांना शिक्षण, रोजगार, व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक संस्थांच्या मदतीने मुलांना प्रवाहात आणले जात आहे.
- कपिलेश इगवे, पोलीस अंमलदार