बनावट चावी तयार करून घरफोडी करणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:26 PM2019-09-07T18:26:26+5:302019-09-07T18:28:29+5:30
महिलेची मालीश करायला घरी गेली असताना घराची चावी घेऊन साथीदाराच्या मदतीने तिची बनावट चावी तयार केली. तसेच संधी मिळताच साथीदारांसह बंद घराचा दरवाजा उघडून घरफोडी करणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात युनिट चारच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. महादेवी शंकर बुलाणी (वय २९, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून इतर दोन साथीदार फरार आहेत.
हिंजवडी : महिलेची मालीश करायला घरी गेली असताना घराची चावी घेऊन साथीदाराच्या मदतीने तिची बनावट चावी तयार केली. तसेच संधी मिळताच साथीदारांसह बंद घराचा दरवाजा उघडून घरफोडी करणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात युनिट चारच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. महादेवी शंकर बुलाणी (वय २९, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून इतर दोन साथीदार फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट चार गुन्हे शाखेचे पथक वाकड हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दोन दिवसांपूर्वी काळेवाडी येथे झालेल्या घरफोडीतील आरोपीची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने नढेनगर, काळेवाडी येथे घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचे कबूल केले. घरफोडीतील सोन्याची कर्णफुले महिलेकडून हस्तगत करण्यात आले असून इतर दागिने आपली बहीण व तिचा प्रियकर यांच्याकडे दिल्याचे सांगितले. सदर कामगिरी युनिट चारचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, उपनिरीक्षक हर्षल कदम, कर्मचारी वासुदेव मुंढे, धर्मराज आवटे, संजय गवारे, अदिनाथ मिसाळ, नारायण जाधव, लक्ष्मण अढारी, गोविंद चव्हाण यांनी केली वाकड पोलीस तपास करत आहेत.