पुणे शहर दलातील महिला पोलिसाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 03:27 PM2021-07-05T15:27:24+5:302021-07-05T15:27:35+5:30
वाकड येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही
पिंपरी: महिलापोलिसाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वाकड येथे सोमवारी (दि. ५) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकलेले नाही. श्रध्दा शिवाजीराव जायभाये (वय २८, सध्या रा. कावेरीनगर पोलीस लाईन, वाकड, पुणे), असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रध्दा जायभाये या विवाहीत आहेत. त्यांचे पती नेव्हीमध्ये नोकरीस असून सध्या ते केरळमध्ये आहेत. श्रध्दा यांना दोन वर्षांची मुलगी आहे.
श्रध्दा यांची मैत्रीण त्यांना फोन करत होती. मात्र श्रध्दा यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वाकड पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी श्रध्दा यांनी पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेतला असल्याचे आढळले. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.
श्रध्दा या पुणे शहर दलाच्या विशेष शाखेत नेमणुकीस होत्या. श्रध्दा यांचे पती नोकरीनिमित्त केरळला असून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांची मुलगी तिची आई श्रध्दा यांच्यासोबत वाकड येथे वास्तव्यास होती. श्रध्दा यांनी मुलीला नातेवाईकांकडे ठेवले होते. त्यानंतर श्रध्दा यांनी आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. श्रध्दा यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली आहे का, याचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे.