महिलेला किरकोळ वादातून लोखंडी रॉडने केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:05 PM2021-05-10T16:05:35+5:302021-05-10T16:05:41+5:30
चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी: टेम्पो पाठीमागे घेण्याच्या कारणावरून लोखंडी रॉडने मारून महिलेला जखमी केले. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परांडे नगर, दिघी येथे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला.
बाळू आत्माराम दास (वय ४८, रा. परांडे नगर) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात रविवारी (दि. ९) फिर्याद दिली आहे. फय्याज मोमीन (वय ४५), रेश्मा फय्याज मोमीन (वय ४२, दोन्ही रा. परांडे नगर), झाकीर (वय ३५, पूर्ण नाव माहीत नाही), इंतीयाज मोमीन (वय ४०, रा. दिघी), अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दास यांनी त्यांच्या मालकीचे घर भाडेकरू गारगुटे यांना भाडेतत्त्वावर दिले. त्यानुसार भगवान जाधव यांच्या चारचाकी टेम्पोमधून गारगुटे साहित्य घेऊन राहण्यासाठी आले. त्यावेळी भगवान जाधव हे टेम्पो पाठीमागे घेत होते. शेजारी राहणाऱ्या फय्याज मोमीन याची पत्नी रेश्मा हीने भाडेकरू गारगुटे, भगवान जाधव व दास यांचा मुलगा प्रवीण यांना टेम्पो पाठीमागे घेण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. दास व त्यांची पत्नी लता यांनी आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण केली. त्यावेळी दास यांची पत्नी लता या भांडण सोडवण्यासाठी आल्या असता लोखंडी रॉडने मारून त्यांना जखमी केले.