Pimpri Chinchwad: महिलेचे फेक अकाउंट करून मागवले ‘कामसूत्र’; चिंचवडमधील प्रकार
By नारायण बडगुजर | Published: March 19, 2024 06:13 PM2024-03-19T18:13:15+5:302024-03-19T18:21:48+5:30
चिंचवड येथे डिसेंबर २०२३ ते १८ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला...
पिंपरी : अनोळखी व्यक्तीने सोशल मीडियावर महिलेच्या नावाने फेक अकाउंट तयार करून तिची बदनामी केली. तसेच बनावट इ-मेलचा वापर करून अश्लील वस्तू मागवल्या. चिंचवड येथे डिसेंबर २०२३ ते १८ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी आहे. तिचा पती साॅफ्टवेअर इंजिनियर आहे. सोशल मीडियावर फिर्यादी महिलेचे अकाउंट आहेत. हे अकाउंट व प्रोफाइल लाॅक नसल्याने महिलेचे वैयक्तिक फोटो आणि माहिती सोशल मीडियावरील सर्व वापरकर्त्यांसाठी खुली आहे. यात अज्ञात व्यक्तीने फिर्यादी महिलेचे फोटो आणि माहिती घेऊन त्याआधारे महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार केले.
बनावट खात्यावरून फिर्यादी महिलेचे इतर व्यक्तींशी प्रेमसंबंध असल्याचे मेसेज करून फिर्यादी महिलेच्या नावाने अश्लील वस्तूंची ऑर्डर केली. फिर्यादी महिलेच्या पतीच्या ईमेल आयडीवर मेसेज केले. तसेच त्यांचा ईमेल आयडी विविध अश्लील साइटवर नोंदवला. फिर्यादी महिलेचे इतर लोकांशी संबंध असल्याचे त्यांच्या मित्र परिवार आणि कुटुंबीयांना मेसेज करून त्यांची बदनामी केली.
अनेकांच्या नावाने फेक अकाउंट
संशयित व्यक्तीने अनेकांच्या फोटो आणि माहितीच्या आधारे विविध फेक अकाउंट तयार केले. तसेच काही ईमेल आयडी व मोबाइल क्रमांकाचा वापर करून प्रौढांसाठीच्या अश्लील वस्तू यात निरोध व इतर साहित्य मागवले. डिलिव्हरी बाॅयकडून संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात येतो. अशाच पद्धतीने फिर्यादी महिलेच्या नावाने देखील काही अश्लील वस्तू मागवल्या. त्यासाठी डिलिव्हरी बाॅयने त्यांनाही फोन केला. मात्र, आम्ही कोणत्याही प्रकारच्या वस्तू मागवल्या नसल्याचे फिर्यादी महिलेने व त्यांच्या पतीने सांगितले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी तपास करीत आहेत.
मानसिक छळ
फिर्यादी महिलेला सोशल मीडियावर फाॅलो करून त्यांची बदनामी केली. तसेच त्यांना अश्लील मेसेज पाठवून त्यांचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे त्यांच्या नावाने अश्लील वस्तू ऑनलाइन ऑर्डर करून संशयिताने त्यांना मानसिक त्रास दिला.