अडीच वर्षांच्या मुलाला घरात ठेवून महिलेची आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 08:52 PM2020-06-18T20:52:07+5:302020-06-18T20:52:47+5:30
गृहिणी असलेल्या कनिका यांनी आठव्या मजल्यावरून उडी मारली. त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा घरात होता.
पिंपरी : इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने आत्महत्या केली. त्यावेळी घरात महिलेचा अडीच वर्षांचा मुलगा होता. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. रहाटणी येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
कनिका नरेंद्रकुमार शर्मा (वय ३३, सध्या रा. डेलवेरा हाउसिंग सोसायटी, शिवराज नगर, रहाटणी, मूळ रा. दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनिका शर्मा या महिलेने डेलवेरा हाउसिंग सोसायटीतील त्यांच्या राहत्या घराच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून गुुरुवारी (दि. १८) दुपारी दीडच्या सुमारास उडी मारली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कनिका यांना पाहून सोसायटीतील काही नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गृहिणी असलेल्या कनिका यांनी आठव्या मजल्यावरून उडी मारली त्यावेळी त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा घरात होता, असे पोलिसांनी सांगितले. कनिका यांचे आईवडील व पती दिल्ली येथे असून, त्यांना घटनेबाबत माहिती दिली आहे. तसेच कनिका यांचा मृतदेह महापालिकेच्या पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात हलविण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.