लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला गमवावा लागला जीव; पिंपळे सौदागर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 05:29 PM2017-11-27T17:29:59+5:302017-11-27T17:39:53+5:30
पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव आहे.
पिंपरी : पिंपळे सौदागर येथील श्री साई सोसायटीतील लिफ्टमधील बिघाडामुळे ज्येष्ठ महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. नीलिमा चौधरी (वय ५८) असे मृत महिलेचे नाव असून याप्रकरणी मृत महिलेच्या सूनेनं सांगवी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नीलिमा पिंपळे सौदागर येथे मुलाकडे आल्या होत्या. २३ नोव्हेंबरला लिफ्टमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नीलिमा चौधरी यांचा मुलगा अमित आनंद पिंपळे सौदागर येथील साई श्री सोसायटीमधील सातव्या मजल्यावर राहतात. आपल्या नातवाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी नीलिमा रुग्णालयात जाण्यासाठी निघाल्या होत्या. २३ नोव्हेंबरला नातेवाईकांसोबत त्या लिफ्टमधून खाली उतरल्या. मात्र, मोबाईल आणि पर्स घरीच राहिल्याचे लक्षात आल्यानंतर त्या पुन्हा घरी आल्या. मोबाईल आणि पर्स घेऊन परत लिफ्टने जात असताना लिफ्टचे बटन दाबले, मात्र लिफ्ट वर आलीच नाही. त्या मजल्यावरील लिफ्टमध्ये शिरण्याचा दरवाजा उघडला. काही कारणामुळे ही गोष्ट नीलिमा यांच्या लक्षात आली नाही आणि त्यांनी लिफ्ट नसलेल्या मोकळ्या जागेत प्रवेश केला. त्यानंतर आत पाऊल टाकताच नीलिमा थेट सातव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर असलेल्या लिफ्टच्या छतावर कोसळल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी त्यांच्या नातेवाईकांची तक्रार आहे.