‘खाकी वर्दी' ची धुरा सांभाळत ‘ती’ने साधला ‘नेम’; पोलीस नाईक रश्मी धावडेची प्रेरणादायी गाथा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 02:41 PM2021-03-08T14:41:49+5:302021-03-08T14:42:07+5:30
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात खोवला मानाचा तुरा...
पिंपरी : शालेय विद्यार्थी असतानाच नेमबाजीची ओढ लागली. त्यात पारंगत होऊन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून पोलीस नाईक रश्मी स्वप्नील धावडे यांनी पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कुटुंबासह ‘खाकी’ वर्दीची जबाबदारी सांभाळत त्यांनी खेळाचा ‘नेम’ साधला आहे.
रश्मी धावडे या मूळच्या थेरगाव येथील आहेत. त्यांचे सासर भोसरी येथील आहे. विज्ञान शाखेच्या पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असताना पोलीस शिपाई म्हणून २००७ मध्ये त्या पुणे शहर पोलीस दलात दाखल झाल्या. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले तेव्हा त्या पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात रुजू झाल्या. पिस्तूल नेमबाजीमध्ये त्यांनी २००९ पासून पोलीस संघाकडून विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. गन फाॅर ग्लोरी प्री नॅशनल या राष्ट्रीय स्तरावरील २०१५ मध्ये झालेल्या स्पर्धेत त्यांनी राैप्य पदक मिळवले. २०१२ मध्ये गरोदर असताना रश्मी यांनी पंजाबमधील जालंधर येथे झालेल्या ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेत सहभाग घेत चमकदार कामगिरी केली होती. बालेवाडी येथे २०१९ मध्ये ऑल इंडिया पोलीस शुटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत सांघिक गटातून कांस्य पदक पटकावले. तसेच वैयक्तिक गटातून चाैथा क्रमांक मिळवला होता.
कोरोनावर मात, शस्त्रक्रियेनंतर पुन्हा सराव
रश्मी यांचे पती स्वप्नील धावडे हे बाॅक्सर असून, संरक्षणदलातून निवृत्त झाले आहेत. गेल्या वर्षी जुलै व ऑग़स्टमध्ये रश्मी यांना कोराना विषाणूंचा संसर्ग झाल्याने सव्वा महिना रुग्णालयात दाखल होत्या. दरम्यान गर्भाशयाची शस्त्रक्रियाही झाली. या आजारपणामुळे आता खेळता येणार नाही, अशी रश्मी यांची मानसिकता झाली होती. मात्र पती स्वप्नीन यांनी त्यांना मानसिक आधार दिला. त्यामुळे खुल्या विभागीय तसेच खुल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी रश्मी यांनी सराव सुरू केला आहे. स्पर्धा व सरावादरम्यान त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीचा सांभाळ स्वप्नील यांना करावा लागतो.
महिलेने बाळाला जन्माला घालणे म्हणजे त्याला जीवन देणे होय. जीवन देऊ शकतो म्हणजे आपल्यात ताकद आहे. त्याची ओळख महिलांना होणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेने आपल्या क्षमता ओळखून पुढे आले पाहिजे. महिला पोलीस खेळाडू म्हणून मला मोठा पल्ला गाठायचा आहे.
- रश्मी धावडे, पोलीस नाईक, विशेष शाखा, पोलीस आयुक्तालय, चिंचवड