देहविक्री करणाऱ्या महिला रस्त्यावरच उभ्या! चिखली, मोशी परिसरात नागरिक वेश्याव्यवसायामुळे त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 14:59 IST2025-01-29T14:59:45+5:302025-01-29T14:59:58+5:30
परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्या असून राजरोजपणे असे धंदे सुरू आहेत, हा संवेदनशील विषय असल्याने पोलीस प्रशासनाने यावर त्वरित कडक कारवाई करावी

देहविक्री करणाऱ्या महिला रस्त्यावरच उभ्या! चिखली, मोशी परिसरात नागरिक वेश्याव्यवसायामुळे त्रस्त
पिंपरी : चिखली, मोशी परिसरामध्ये काही ठिकाणी देहविक्री (वेश्या व्यवसाय) करणाऱ्या काही महिला राजरोस रस्त्यावरच उभ्या राहून अनैतिक गोष्टी करीत आहेत, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, यासाठी चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने पोलिसांना पत्र दिले आहे.
चिखली, मोशीमधील मोशी- आळंदी रोडवरील अक्षा एम्पायर सोसायटीसमोर असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ, तसेच रिव्हर रेसिडेन्सीच्या ते कोलसिस ग्रीन सोसायटीच्या रस्त्यावर व या आजूबाजूला मोकळ्या जागेमध्ये रात्रीच्या वेळी काही महिला देहविक्रीसाठी उभ्या राहतात. याबाबत सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, पोलिस प्रशासनाकडून याकडे डोळेझाक केली जाते. या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या भागातील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना कडक सूचना द्याव्यात, याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले आहे.
चिखली-मोशी परिसरातील मोशी-देहू रस्त्यावरील चौकामध्ये सायंकाळपासून रात्री बारापर्यंत अनेक महिला उभ्या राहून देहविक्रीचा व्यवसाय करतात. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सोसायट्या आहेत. नागरी वस्ती असताना राजरोजपणे असे धंदे सुरू आहेत. संवेदनशील विषय असल्यामुळे पोलिस प्रशासनाने यावर त्वरित कडक कारवाई करावी. - संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.