महिला जागेसाठी होणार चुरस
By admin | Published: October 16, 2016 04:03 AM2016-10-16T04:03:39+5:302016-10-16T04:03:39+5:30
दिघी आणि बोपखेल दोन गावांचा मिळून प्रभाग क्रमांक चार झाला आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गांवाचा परिसर या प्रभागात आहे. चोहूबाजूने असणाऱ्या लष्करी
पिंपरी : दिघी आणि बोपखेल दोन गावांचा मिळून प्रभाग क्रमांक चार झाला आहे. त्यात नव्याने समाविष्ट झालेल्या गांवाचा परिसर या प्रभागात आहे. चोहूबाजूने असणाऱ्या लष्करी प्रकल्पांचा वेढा यामुळे येथील विकासावर नियंत्रण आले आहेत. सामान्य आणि मध्यमवर्गीयांची संख्या या प्रभागात अधिक आहे. त्यामुळे हे मतदार निर्णायक असणार आहेत. या प्रभागात दोन जागा अनुसूचित जाती, जमाती आणि उर्वरित दोनपैकी एक जागा ओबीसी महिला, सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. खुल्या गटातील पुरुषांना लढण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे महिलांच्या गटात उमेदवारीसाठी चुरस असणार आहे.
महापालिकेच्या गेल्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक ३१ दिघी गावठाण आणि प्रभाग ६४ दापोडी-बोपखेल अशा दोन प्रभागांचा समावेश यंदाच्या चार क्रमांकाच्या प्रभागात झाला आहे. दोन भागात हा प्रभाग विभागलेला आहे. नदीपात्र, रस्ते अशा नैसर्गिक गोष्टीच्या निवडणूक आयोगाच्या निकषाचे पालन केलेले दिसत नाही. मनमानी पद्धतीने प्रभाग फोडला आहे.
बोपखेल हा प्रभाग गेल्या वेळी दापोडी परिसराला जोडला गेला होता. तर दिघीचा काही परिसर भोसरी परिसराला जोडला गेला होता. बोपखेलचा परिसर आता दिघीला जोडला आहे. सीएमईच्या हद्दीने मुळानदीने कैलास बाऊन्ड्री, पुढे बोपखेल गाव लष्कराच्या हद्दीपर्यंत असा एक भाग तयार केला आहे. दुसऱ्या भागात आळंदी रस्त्याकडील लष्कराच्या हद्दीने गणेशनगर, समर्थनगर, हॉटेल मराठा दरबार, दिघी मॅगझिन चौक, पुढे भोसरी-आळंदी रस्त्याने दिघी गावच्या हद्दीने पांडुरंग रोकडे यांची मिळकत, पंचशील बुद्धविहार, कृष्णानगरपर्यंत आणि पुढे हा भाग लष्कराच्या हद्दीपर्यंत असणाऱ्या दिघी गावठाणास जोडला आहे.
जुन्या दोन प्रभागांची मोडतोड करून हा प्रभाग तयार केला आहे. गत निवडणुकीत दिघी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा सुपे, चंद्रकांत वाळके, दापोडी बोपखेल प्रभागातून आरपीआय आठवले गटाच्या चंद्रकांता सोनकांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय उर्फ नाना काटे निवडून आले होते. सोनकांबळे यांचा अर्धा भाग दुसऱ्या प्रभागास जोडला गेला आहे. त्यामुळे त्या कोणत्या प्रभागातून उभ्या राहतात, याबाबत उत्सुकता आहे. उपलब्ध आरक्षणानुसार विद्यमान नगरसेवक चंद्रकांत वाळके आणि संजय काटे यांना या प्रभागातून निवडणूक लढविता येणार नाही.
काटे आणि वाळके या दोघांनाही आपल्या पत्नीस निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे. त्यामुळे ओबीसी आणि सर्वसाधारण गटांतील महिला उमेदवारांमध्ये चुरस असणार आहे. सुपे यांना हा प्रभाग सेफ झाला आहे. सर्वसाधारण कामगार कष्टकरी वर्गाची संख्या अधिक असल्याने त्यांचे मत निर्णायक ठरणार आहे. या दोन्ही गावांच्या आजूबाजूंनी लष्कर असल्याने विकासावर नियंत्रण आलेले आहे. बहुतांश आरक्षणे प्रतीक्षेत आहेत. गेल्या वेळी या प्रभागातून राष्ट्रवादीला तीन आणि आरपीआयला एक जागा मिळाली होती. (प्रतिनिधी)