महिला कामगारांनी केला रास्ता रोको
By admin | Published: June 30, 2017 03:45 AM2017-06-30T03:45:39+5:302017-06-30T03:45:39+5:30
दिघी मॅगझीन चौक येथील डायनामिक लॉजेस्टीक मजदूर संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
भोसरी : दिघी मॅगझीन चौक येथील डायनामिक लॉजेस्टीक मजदूर संघटनेच्या महिला कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी आळंदी- भोसरी मार्गावर सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला.
प्रोथॉन या खेळणी बनवणाऱ्या कंपनीतील ८०० ते ९०० महिला कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांपासूनचा पगार झालेला नाही. याबाबत कंपनी प्रशासानाकडून दरवेळी चालढकल केली जाते़ कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या या महिला कामगारांना काम करताना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत, असा आरोप महिला कामगार करत आहेत. गेली ३ महिन्यांपासून पगार झाला नसल्याने महिला कर्मचारी रस्त्यावर उतरल्या. यासाठी भोसरी-आळंदी रस्ता अर्ध्या तासापासून रोखून धरला होता. या रास्ता रोकोमध्ये सुमारे ५० महिला सहभागी झाल्या होत्या.
कंपनीकडून कंत्राटदाराची बिले दिली असून यामध्ये कंत्राटदारांनेच कर्मचाऱ्यांचे पगार थकवले असल्याचे उघड झाले. या वेळी कंपनी प्रशासनाने व पोलिसांनी संबंधित कंत्राटदारांला कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्यावेत असे आदेश दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.