महिलांचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2016 12:29 AM2016-05-11T00:29:23+5:302016-05-11T00:29:23+5:30
शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित मुतारी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही.
सुवर्णा नवले, पिंपरी
शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित मुतारी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही. युरिन नियंत्रित केल्यास मूत्रपिंड व इन्फेक्शनसारख्या आजारांना महिला बळी पडतात.
सर्वसामान्य महिलांपासून ते कॉर्पोरेट आॅफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. महिला घरातून किंवा आॅफिसमधून बाहेर पडल्यावर शहरातील प्रमुख रस्ते व चौकांत मुतारी व स्वच्छतागृहांची सोय नाही. याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. या सर्वांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. महिलांना मूत्रपिंडासारखे आजार जडत आहेत. पोटदुखी होणे अशा आजारांना महिला बळी पडतात. महिला पोलिसांना असुविधा...
महिला पोलीस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी महिला सर्व महिलांचा यामध्ये समावेश आहे. याचा सर्वांत जास्त विपरीत परिणाम महिला पोलिसांच्या आरोग्यावर होत आहे. बंदोबस्तावेळी दिलेली ड्युटी किंवा बारा तास घराबाहेर करावी लागणारी नोकरी यामध्ये पोलीस महिलांची कुचंबणा होते. पोलीस चौकीच्या ठिकाणी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्या वेळी महिला पोलिसांना शेजारील सोसायटीमध्ये स्वच्छतागृह वापरण्यासाठी विनंती करावी लागते.
मजूर महिलांची कोंडी...
भाजीविक्रेत्या महिला, गवंडीकाम, तसेच इतर किरकोळ विक्रीव्यवसाय करणाऱ्या महिलांना अशा समस्या वारंवार उद्भवतात. सध्या वैयक्तिक शौचालयांमुळे ग्रामीण भागात स्वच्छतागृहे उभी राहिली. मात्र, आजही गोरगरीब व रोजगारासाठी शहरात आलेल्या महिलांची स्वच्छतागृहाअभावी कोंडी होते. त्यामुळे महिलांना उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे.
बसस्थानकांवर महिलांची लूट...
बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनची स्वच्छतागृहे ठेकेदारी पद्धतीवर चालवायला दिलेली असतात. अशा वेळी ठेकेदारांचे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असते. पे अँड युज तत्त्वावर ही स्वच्छतागृहे चालविण्यासाठी दिलेली असतात. मात्र, अशा स्वच्छतागृहांमध्येही महिलांकडून शौचालयाचा वापर करण्यासाठी बेकायदा पद्धतीने पैशांची लूट केली जाते. मुतारीचा वापर करण्यासाठी दोन रुपये व शौचालयाचा वापर करण्यासाठी पाच ते दहा रुपये आकारले जातात. मुतारीसाठी फक्त दोन रुपये शुल्क आहे. जादा पैसे आकारून महिलांची लूट केली. स्वच्छतागृहांची नियमावली सर्वांना माहीत नसल्याने पैसे भरून स्वच्छतागृहांचा वापर करण्यास महिला टाळाटाळ करतात. अशा स्वच्छतागृहांच्या समस्येत महिला अडकलेल्या आहेत.