महिला लोकप्रतिनिधीही उदासीन
By admin | Published: May 12, 2016 01:08 AM2016-05-12T01:08:43+5:302016-05-12T01:08:43+5:30
राजकारणासह विविध क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. महिलांच्या समस्या त्यांच्याशिवाय कोणाला कळणार नाहीत, असे म्हटले जाते.
सुवर्णा नवले, पिंपरी
राजकारणासह विविध क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. महिलांच्या समस्या त्यांच्याशिवाय कोणाला कळणार नाहीत, असे म्हटले जाते. परंतु, शहरात स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबणा होत असूनही महिला लोकप्रतिनिधींनी त्याकडे काणाडोळा केल्याचे दिसून येते.
महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के मिळाले. त्यामुळे शहरात ६६ महिला नगरसेविका आहेत. सध्या महिलांचे महापालिकेत वर्चस्व आहे. महापौरांसह पक्षनेत्या, प्रत्येक पक्षातील प्रमुख पदाधिकारी महिलाच आहेत. मात्र, महिलांच्या समस्येकडे लक्ष द्यायला लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
रोज घरातून विविध व्यवसाय व नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह नसल्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी स्वच्छतागृहे उपलब्ध आहेत. त्यांचीही दुरवस्था आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी असलेली महिलांची स्वच्छतागृहे असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. शिवाय, काही स्वच्छतागृहे मोडकळीस आलेली आणि कडी-कोयंडेच नसलेली आहेत. दरवाजे, खिडक्यांच्या काचा तुटलेल्या
आहेत. महिला जीव मुठीत घेऊन अशा स्वच्छतागृहांचा वापर करतात.