महिला कर्मचारी समितीत हव्यात
By admin | Published: March 9, 2016 12:37 AM2016-03-09T00:37:39+5:302016-03-09T00:37:39+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील महिला तक्रार निवारण समितीत महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांतील महिला तक्रार निवारण समितीत महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महतो यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला दिली.
सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा, घरांचा प्रश्न, त्यांच्यावर होणारे अत्याचार यावरील उपाययोजना व अंमलबजावणी यांचा आढावा घेण्यासाठी महतो यांनी मंगळवारी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी सहआयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त महेश डोईफोडे, प्रशांत खांडकेकर, मिनीनाथ दंडवते, दत्तात्रय फुंदे, सुभाष माछरे, एमआयडीचे कार्यकारी अभियंता डी. एम. क्षीरसागर, सफाई कर्मचारी तक्रार निवारण समितीचे सदस्य सागर चरण आदी उपस्थित होते. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात महिला तक्रार निवारण समिती असते. महापालिकेतील विभागांमध्ये या समित्या आहेत. मात्र, या समितीत महिला सफाई कर्मचारी नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या समितींमध्ये महिला सफाई कर्मचाऱ्याचा समावेश करावा, अशी सूचना महतो यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमावे लागतात. (प्रतिनिधी)