महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती

By Admin | Published: May 4, 2017 01:41 AM2017-05-04T01:41:13+5:302017-05-04T01:41:13+5:30

खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा

Womens Wonders of Water | महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती

महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती

googlenewsNext

दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागत आहे. अनेकवेळा टँकरची मागणी करूनही टँकर सुरू होत नाही. येत्या दोन दिवसांत टँकर सुरू न झाल्यास खेड पंचायत समितीवर ‘हंडा मोर्चा’ काढण्याचा इशारा महिलांनी दिला आहे .
पूर्व भागात आंबेगाव व खेड तालुक्याच्या सीमेवर चिंचबाईवाडी गाव आहे. या परिसरात दर वर्षी जानेवारी महिन्यात पाणीटंचाई निर्माण होते. महिलांना व लहान मुलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. या जलयुक्त शिवार अंतर्गत अनेक कामे झाली आहेत. मात्र, यांचा उन्हाळ्यात काही उपयोग होत नाही.
गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्या आहेत. रोज सकाळी सकाळी दोन १५ हंडे मिळतील एवढेच पाणी मिळत आहे. नंतर येणाऱ्यांना गाळमिश्रित पाणी मिळत आहे. तसेच महिलांना जीव धोक्यात घालून विहिरीतून पाणी काढावे लागत आहे. जनावरांना पाणी पिण्यास मिळत नाही.
या परिसरात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, यासाठी महिन्यापूर्वी टँकरचा प्रस्ताव खेड पंचायत समितीत गावाने दिला आहे. प्रस्ताव पाठविला आहे, तहसीलदार व गटविकास अधिकारी आम्ही पाहणी करण्यासाठी येऊ, अशी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे चिंचबाईवाडी माजी सरपंच संतोष गार्डी यांनी सांगितले.
दोन दिवसांत या परिसरात टँकर सुरू न झाल्यास पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार असल्याचे बबाबाई रणपिसे, भारती कोरडे, शांताबाई रणपिसे, शाकुबाई रणपिसे, प्रियंका रणपिसे यांच्यासह गावातील महिलांनी सांगितले.

चिंचबाईवाडी येथे टँकर सुरू करावा, यासाठी दि.४ एप्रिल रोजी प्रस्ताव दिला आहे. त्यानंतर अनेक वेळा पाठपुरावा गटविकास अधिकारी यांच्याकडे केला आहे. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. आमच्या गावाला पाण्याचा टँकर आला नाही. गावामध्ये भीषण पाणीटंचाई निमार्ण झाली असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहे. गाळ मिश्रित, गढूळ पाणी प्यायल्यामुळे लहान मुले आजारी पडत आहे. तसेच, पशुधन धोक्यात आले आहे. दोन दिवसांत पाण्याचा टँकर सुरू न झाल्यास गावातून खेड पंचायत समितीवर हंडा मोर्चा नेणार आहे.
- संतोष गार्डी,
माजी सरपंच, चिंचबाईवाडी



राजुरी परिसरात विहिरी कोरड्या

राजुरी : राजुरी परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी खालावली असून, पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे.
राजुरी (ता. जुन्नर) परिसरातील उंचखडक आबाटेक या ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या परिसरात असलेल्या विहिरी तसेच बोअरवेल आटल्या आहेत. सध्या कडक उन्हाळा चालू असल्याने याचा फटका विहिरीमध्ये असलेल्या पाण्याला बसला आहे. सध्या या परिसरात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी असलेला चारादेखील पाण्याअभावी जळू लागला आहे. या ठिकाणाहून जात असलेल्या पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याला गेल्या महिन्यात पाणी सोडले होते. त्यामुळे या परिसरात असलेले बंधारे भरले होते. परंतु उन्हाळ्यामुळे बंधाऱ्यात असलेले पाणीदेखील आटले आहे. या परिसरात पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Womens Wonders of Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.