प्राचीन अवशेषासाठी प्रयत्न, बुजलेल्या वाघेश्वर मंदिर परिसरात कार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:05 AM2018-05-09T03:05:42+5:302018-05-09T03:05:42+5:30
मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.
पवनानगर - मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातील पश्चिम पट्ट्यामध्ये असलेले वाघेश्वर हे गाव पवना धरणाच्या पाण्यात बुडाले आहे. पुण्यातील बारा मावळा परिवारातर्फे ज्या वस्तू मातीमध्ये गाडल्या गेल्या होत्या. त्या वस्तूंचे खोदकाम करून वस्तू मंदिराच्या शेजारी आणून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. संपूर्ण मंदिर जीर्ण अवस्थेत असले, तरी त्याच्या अवशेषांवरून त्याचे तत्कालीन वैभव जाणवत आहे.
तरी यासाठी पुरातन विभागाला बारा मावळा परिवारातील सदस्यांनी कळवले असून, जीर्ण झालेल्या वस्तू एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवण्यासाठी लवकरात लवकर परवानगी देण्यात यावी, यासाठी बारा मावळा परिवारातर्फे विनंती केली आहे. या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य महेश कदम, नवनाथ पायगुडे, किरण खामकर, महेंद्र फाले व वाघेश्वर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
त्या वेळी वाघेश्वर गावाचे व इतर अनेक गावांचे विविध ठिकाणी स्थलांतर करण्यात आले, तर वाघेश्वर गावाचे शेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर स्थलांतर करण्यात आले आहे. गावामध्ये प्राचीन काळातील एक शंकराचे मंदिर होते, ते ज्या वेळी धरणामध्ये पाण्याची साठवणूक केली. त्या वेळी शंकराचे मंदिर पाण्यात बुडून गेले आहे; परंतु दर वर्षी एप्रिल व मे महिन्यामध्ये धरणाच्या पाण्याची पातळी कमी होते त्या वेळी मंदिराच्या काही दुर्मिळ वस्तू जीर्ण अवस्थेत त्या ठिकाणी पहावयास मिळतात. त्यासाठी परिसरातील अनेक नागरिक दर्शनासाठी येतात.
मंदिराचा गाभारा, मोडकळीस आलेला कळस, मंदिराच्या सभामंडपाचे अवशेष, मंदिर परिसरातल्या विरगळी आणि
समाध्या तर गाडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. तर या वेळी बारा मावळा परिवाराचे सदस्य बोलताना सांगत होते, की जसे किल्ल्याचा ठेवा आपण जपत असतो, तसा या मंदिराचा पण ठेवा जपण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न
करणार आहे.
उन्हाळा आला की धरणातील पाणीसाठा कमी होतो. त्यानंतर वाघेश्वर मंदिराचे दर्शन घडते. परंतु, यातील पुरातन अवशेष याची जोपासना व्हावी यासाठी पुरातत्त्व विभागाकडे बारा मावळ संघटना पाठपुरावा करीत आहेत.